सिद्धनेर्ली ता. १८ : दलित समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राजे बॅंकेतून राजर्षी शाहू महाराज कर्ज योजनेतून अर्थसाह्य केले.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारस म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन केले आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील शैलेश कांबळे यांच्या यश रोपवाटिकेचे उदघाटन व राजे बँकेच्यावतीने राजर्षी शाहू महाराज कर्ज योजनेतील लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतीशील जयंती कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
दलित तरुणाच्या रोपवाटिकेचे उद्घाटन व तरुणांना कर्ज मंजुरी पत्र वाटपाने कृतीशील जयंती
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन व रोपास पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्री घाटगे पुढे म्हणाले, बहुजन समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्व. राजे विक्रमसिंह घाटगे सातत्याने प्रयत्नशील होते.त्यांचा हाच वारसा पुढे चालवत राजे बँकेच्या माध्यमातून बहुजन समाजातील तरुणांना साठ कोटीहून अधिक रुपयांचा कर्जपुरवठा व्यवसायासाठी केला आहे. या तरुणांनी कुणाच्या दारात जाऊन हात पसरण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे. हेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खर्याअर्थाने अभिवादन ठरेल.
उजाळा शाहू- आंबेडकर ऋणानुबंधांना
यावेळी आंबेडकर यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणासह विविध प्रसंगी मदत करत प्रोत्साहन दिल्याची उदाहरणे अनेक वक्त्यांनी भाषणातून दिली.या दोघांमध्ये बंधुत्वाचे नाते होते.शाहू महाराज व आंबेडकर यांच्यातील रुणानुबंधांना उजाळा देत हाच वारसा राजे समरजितसिंह घाटगे यांनीआजही जपला आहे.अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी अक्षय पाटील,सुप्रिया कांबळे, आकाशदीप कांबळे,बाबुराव कांबळे,अक्षय घाटगे,प्रमोद हर्षवर्धन या गुणवंतांचा सत्कार केला. यावेळी प्रमोद हर्षवर्धन,नामदेव सरदेसाई, लखन हेगडे,आकाश पाटोळे,शैलेश कांबळे,सुप्रिया कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपिठावर राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे, राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील,शाहूचे संचालक प्रा.सुनिल मगदूम,सचिन मगदूम,संजय नरके,भाऊसो कांबळे,प्रताप पाटील,रंगराव तोरस्कर,उमेश सावंतआदी उपस्थित होते. स्वागत रमेश कांबळे यांनी केले.आभार एम.जे.कांबळे यांनी मानले.