बातमी

सिद्धनेर्ली येथील महालक्ष्मी दूध संस्थेच्या दसरा ठेव वाटप

पिंपळगाव खुर्द (आण्णाप्पा मगदूम):- येथील श्री महालक्ष्मी दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांना शाहू कारखान्याचे व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते दसरा ठेवीचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, शेती बरोबरच दुग्ध पालन व्यवसायातून शेतकऱ्यांना आपली आर्थिक प्रगती साधता येईल. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने जनावरांच्या गोठ्यासाठी कर्ज वाटप योजना चालू असून ज्यांना मोठ्या स्वरूपात उद्योग सुरू करावयाचा आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

या संस्थेची स्थापना 2008 मध्ये झाली असून सुरवातीपासूनच संगणक प्रणालीचा वापर केला जात आहे. संस्थेची मध्यवर्ती ठिकाणी तीन गुंठे जागा आहे. या जागेत मागील वर्षी सोळा लाख रुपये खर्च करून आर. सी. सी. इमारत बांधण्यात आली आहे. संस्थेमध्ये दररोज बाराशे लिटर दूध संकलन करण्यात येते. यावेळी दसरा ठेव साडेतीन लाख, दूध बोनस सतरा लाख व पशुखाद्याचे रिबेट सवीस हजार असे जवळजवळ एकवीस लाख रुपये दूध उत्पादकांना देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रा सुनील मगदूम, माजी सरपंच वाय व्ही पाटील, जिल्हा ग्रामीण धनगर समाजाचे जिल्हा अध्यक्ष राघू हजारे, संस्थेचे चेअरमन युवराज पाटील, व्हाईस चेअरमन सुनील निकम, सचिव जगन्नाथ हुजरे, सर्व संचालक, कर्मचारी, दूध उत्पादक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *