सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता कागल येथे सुमारे 60 लाख रुपयांचा रस्ता करून रस्ताचा काहि भाग विहिरीत कोसळला आहे. लाखो रुपये खर्च करून केलेला रस्ता प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे गेली सहा महिने विनावापर पडून आहे. विशेष घटक योजनेतून लाखो रुपये रस्ते व साकव बांधणीसाठी खर्च केलेला रस्ताचा काही भाग विहीरीत पडला आहे. शेतकऱ्याना शेताकडे जाण्याचा रस्ताच बंद झाला असुन प्रशासन मात्र डोळे झाकुन बसले आहे का?एखादा मोठा अपघात झालेवरच सगळे जागे होणार का?असा प्रश्र शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
सिध्दनेर्ली येथील वीज वितरण कंपनीपासुन पुढे घोल वसाहतीमधुन जाणारा हा रस्ता एक वर्षापुर्वी मुरुमीकरण करून पुर्ण केला होता.घोल वसाहतीच्या पाणंदीला लागुनच पन्नास फुट खोल विहीर आहे. विहिरीलगत रस्ताचा काही भाग त्या विहीरीत सहा महिनेपुर्वी कोसळला आहे.त्यामुळे वाहतुक पुर्णपणे बंद झाली आहे. त्यांचा फटका शेतकऱ्यांना तसेच वाहनधारकांना बसत आहे.सध्या विहिरीलगत 3 ते 4 फुटच रस्ता शिल्लक राहिलेला आहे.अनेक दुचाकीस्वार धोकादायकपणे हा रस्ता वापरत आहेत.
पुढील काही महिन्यात पावसाळा सुरू होत असून सदर रशिलेला रस्ता देखील विहिरीत कोसळण्याची शक्यता आहे. रस्ता करताना विहीरीला सरंक्षक कठडा बांधणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे संरक्षण कट्टाच बांधला नसलेने रस्ताच विहीरीत ढासळून शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. त्याच बरोबर विहीर मालक शेतकऱ्यांलाही त्याचा फटका बसलेला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वच थरातून विचारला जात आहे.
याबाबत अनेकवेळा सदर विहीर मालक ,तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांनी तक्रार करून,निवेदन देवुनही कोणीही दखल घेत नसुन कंत्राटदारही आपली जबाबदारी झटकत टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात आहे. अनेक वेळा स्थानिक प्रसनाकडे दाद मागून देखील कोणत्याही विभागाने तत्परतेने दखल घेतलेली नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. एकंदरीत कोणते ही नियोजन न करता हा रस्ता केलाच कसा?याला मंजुरी कशी मिळाली?आधिकारी यांनी पुर्व सर्व्हक्षण कसे केले?असे प्रश्न निर्माण होत आहेत.याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
स्थानिक पुढाऱ्यांची शेकऱ्यांना आश्वासनाची खैरात
गेल्या सहा महिन्यात शेतकऱ्यांनी स्थानिक नेत्याकडे अनेक वेळा आपली कैफियत मांडली असताना देखील नुसती आश्वासने मिळाल्याने सध्या शेतकऱ्यांनी देखील त्याच्या कडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे.त्याच बरोबर सरकारी अधिकारी येऊन अनेक वेळा पाहणी करून गेले आहेत.मात्र सदर गोष्टीवर तत्परने कोणतीही कार्यवाही आज पर्यंत झालेली नाही.सहा महिने होऊन देखील अद्याप ठोस पाऊले उचली नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.