शहराच्या विस्तारित क्षेत्राचा सिटीसर्वे प्रारंभ
कागल : राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेले कागल शहर सर्वांग सुंदर आहेच. स्वच्छता, विकास आणि सोयी सुविधांच्या बाबतीत ही कागल शहर राज्यासह, देशात नेहमीच नंबर वन असेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल शहराच्या विस्तारित क्षेत्राच्या सिटी सर्वे योजनेचा प्रारंभ मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शहरातील आठ ओपन जिमचे लोकार्पण व स्वतःच्या मालकीच्या जागेवर वैयक्तिक नवीन घरकुल बांधकाम करणे, केंद्रशासनाच्या पहिल्या अनुदानाचे वाटप हे कार्यक्रम ही झाले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, वाढत्या शहरीकरणाचा प्रश्न सबंध महाराष्ट्रभर आहेत, परंतु स्वच्छता विकासकामे आणि सोयीसुविधांच्या पुरवठ्यामुळे तो कागलमध्ये सुटलेला दिसतो, ही चांगली गोष्ट आहे. भुमिअभिलेखचे उपसंचालक किशोर तवरेज म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रभर खेड्या-पाड्यातील सिटीसर्वे करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ग्रामविकास विभागाने हाती घेतला आहे. त्यामुळे ६ लाख कोटी रुपयांची तरलता निर्माण होणार आहे. कागलच्या या प्रकल्पामुळे २०० कोटी रुपयांची तरलता निर्माण होईल. माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घराचा दरवाजा जनतेसाठी सदैव उघडा असतो. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही त्यांच्या कार्यालयाचा दरवाजा सदैव उघडा ठेवून एक चांगला आदर्श घालून दिला आहे. जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे अनुकरण करावे. त्यामुळे जनतेलाही दरवाजाबाहेर ताटकळत राहावे लागणार नाही आणि कामांचा निपटारा ही जलद गतीने होईल. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले ॲड. संग्राम गुरव म्हणाले, दोन वर्षांपूर्वी मी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षात आलो. त्याआधीची तीन वर्षे लीडरशिप कशी नसावी याची अनुभूती देणारी तर अलीकडची दोन वर्ष लीडरशिप कशी असावी याची अनुभूती देणारी ठरली आहेत.
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले,
🟠 अत्याधुनिक ड्रोन व रोव्हर्सद्वारे अचूक व जलद विस्तारित क्षेत्रातील मिळकतीचे मोजमाप, नकाशा व मिळकत पत्रिका मिळणार आहेत.
🟠 सर्वेक्षणातून प्रत्येक घराचा नकाशा, सीमा व क्षेत्र यांची माहिती मिळणार आहे.
🟠 मालमत्तेचा अधिकार पुरावा, मिळकतपत्रिकेच्या स्वरूपात मिळणार आहे.
🟠 कर्ज उपलब्धता विविध, आवास योजनाची मंजुरी, जागेची मालकी हक्क, तंटे – वाद उद्भवणार नाहीत.
🟠 जमिनी, खरेदी – विक्री, व्यवहारातील फसवणूक टाळणे सोपे होणार आहे.
यावेळी व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, प्रांताअधिकारी सुशांत बनसोडे, भूमीअभिलेख पुणे जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव, तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, उपाधिक्षक सौ.सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, नगरसेवक सतीश घाडगे, संजय चितारी, सौ माधुरी मोरबाळे, सौ पद्मजा भालबर, सौ शोभा लाड, सौ जयश्री शेवडे, सौ नुतन गाडेकर आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत पांडुरंग पोटे यांनी केले. प्रास्ताविक नगरपालिकेचे पक्षप्रतोद नितीन दिंडे यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार नगरसेविका सौ.मंगल संग्राम गुरव यांनी मानले.