मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील पात्र नागरिकांसाठी आयुष्यमान भारत ई कार्ड काढण्यासाठी मुरगूड नगरपरिषदेने गुरुवार दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वा. पर्यंत नगरपरिषद सभागृहामध्ये एक दिवसीय कॅम्पचे आयोजन केल्याची माहीती नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संदिप घार्गे यांनी दिली आहे.
या कॅम्पमध्ये नागरीकांची एकत्रित आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत ई-KYC करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे.
ई कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड, आधारकार्ड, आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर व स्वतः लाभार्थी उपस्थित असणे आवश्यक आहे. तरी या कॅम्प अंतर्गत शहरातील पात्र नागरिकांनी सहभाग घेऊन शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. संदिप घार्गे यांनी केले आहे.