बातमी

निढोरीच्या ग्रामपंचायत झाडू कामगाराच्या मूलग्याचा प्रबोधनात्मक व्याख्यानाने वाढदिवस साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिक्षण हे व्यक्तीमहत्त्व विकासाचे महत्वाचे साधन असुन त्याचा विकास प्रक्रियेशी खुप मोठा संबंध येतो त्यामुळे युवकांनी शिक्षणावर विशेष भर द्यावा. समृद्ध जीवनासाठी युवकांनी व्यक्तिमहत्व विकास आणि कौटुंबिक विकासाला पहिलं प्राधान्य दिले पाहिजे त्यानंतरच राष्ट्रविकास सहज साध्य आहे. पण राष्ट्र विकासाच्या प्रक्रियेत शिवरायांच आणि भिमरायांच चरित्रच युवकांची विचारशक्ती आणि ह्दयशक्ती जागृत ठेवणार आहे. त्यामुळे शिवरायांच्या आणि भिमरायांच्या विचारांचा जागर करुन वाढदिवस साजरा करण्याचा संजय कांबळे व संगिता कांबळे या पालकांचा हा निर्णय कौतुकास्पदच आहे. याचा इतर पालकांनी ही आदर्श घेवून भरकटत चाललेल्या समाजाला आणि भरकटत चाललेल्या युवा पिढीला दिशा देण्याच्या प्रवाहामध्ये सामिल व्हावे असे मत संभाजी ब्रिगेडचे शिवव्याख्याते सागर कोळी यांनी व्यक्त केले.

ते निढोरी ता – कागल येथील ग्रामपंचायत झाडू कामगार संजय लक्ष्मण कांबळे यांचा चिरंजीव धीरज कांबळे या युवकाच्या 20 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी ‘शिवराय, भिमराय आणि आजची तरुणाई’ या विषयावर आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यकामाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणविस्तार अधिकारी एम. टी. सामंत सर होते.

धीरज हा निढोरी ग्रामपंचायतचे झाडू कामगार संजय लक्ष्मण कांबळे यांचा चिरंजीव असुन तो सध्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड येथे बी. कॉमच्या द्वितीय वर्षामध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कुटुंबियांना आर्थिक हातभार लागावा आणि आपला ही शैक्षणिक खर्च भागावा या उद्देशाने तो मोकळ्या वेळात दुधाच्या टेम्पोवर ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. बी. कॉम चे पदवीचे शिक्षण पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत धिरजचे वडील संजय कांबळे यांनी उपस्थितांना पुस्तकभेट देवून “वाचाल तरच वाचाल ” हा संदेश देत वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ प्रदीप कांबळे यांनी केले तर सूत्रसंचलन कार्यक्रमाचे आयोजन विकास सावंत यांनी केले.

ग्रामपंचायतीचा झाडू कामगार असल्यामुळे गावाची स्वच्छता करता करता अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये परिसराची स्वच्छता करण्यासाठी जाण्याचा योग आलाच पण मुलग्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांच्या मनाची स्वच्छता करण्याचा हा योग मनाला सुखावणारा आहे त्यामुळे भविष्यातील प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांनी करण्याचा मनोदय आहे अशा भावना संजय कांबळे यांनी व्यक्त केल्या. यावेळी वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी, ओंकार कांबळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी सरपंच अमित पाटील, माजी मुख्याध्यापक वाय. एस. कांबळे, वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी, माजी शिक्षणविस्तार अधिकारी जयवंत हावळ, ओंकार कांबळे, विकास सावंत, संगिता कांबळे, सिद्धेश डवरी, सुरज कांबळे, मनोज माने, बी. एम. कांबळे, शिवप्रेमी धोंडीराम परीट, अंनिसचे कार्याध्यक्ष भिमराव कांबळे, सचिन सुतार, विकी साळोखे, युवराज कांबळे, विनायक मोरे, स्मिता कांबळे, पवन माने, ओंकार सुतार, दयानंद सागर, समाधान सोनाळकर, किरण कांबळे, विक्रम पाटील इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ या गाण्याने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *