बातमी

नोकरी मागणारे नव्हे तर देणारे होवूया – पालकमंत्री हसन मुश्रीफ

तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळाव्यांची कागल येथून सुरुवात

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे उद्योजक होवूया, असे आवाहन पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक दिवसीय तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळाव्यांच्या उद्घाटन प्रसंगी नवउद्योजकांना केले. कागल येथील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला व्यापकपणे व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे सर्व तालुक्यांमध्ये आयोजन करण्यात येत आहे. तालुक्यातील पहिला मेळावा कागल तालुक्यात झाला.

श्री. मुश्रीफ म्हणाले, आपल्या आवडीच्या उद्योग उभारणीतून उद्योग वाढविणे सोपे जाते. उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अशा सर्व योजना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एका छताखाली मेळाव्याच्या निमित्ताने येत आहेत. या सर्व योजनांची माहिती घेवून लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेवून आपली उन्नती साधावी.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी मेळाव्यातील प्रत्येक स्टॉलला व्यक्तीश: भेट देवून प्रत्येक योजनेची माहिती घेतली. तसेच याठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील स्टॉल पाहण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले. विविध योजनांच्या स्टॉलवर कर्जाची माहिती व मार्गदर्शन देण्यात येत असल्याचे सांगून ते म्हणाले, कागल तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच स्वत:चा उद्योग उभारुन समृद्ध होण्याचा प्रयत्न करावा. केंद्र व राज्य शासन प्रत्येक उद्योजकाच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कागलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषीअधिकारी अरुण भिंगारदेवे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी, महानगरपालिका उपायुक्त केशव जाधव, अरुण नरके फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चेतन नरके तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच उद्योजक व नवउद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील विविध विभागांनी अनेक योजनांतून जिल्ह्यात हजारो उद्योजक तयार केल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, आता नोकरी व उद्योगामधील उर्वरीत दुर्लभता दूर केली जातेय. स्टार्टअप, स्कील इंडीया योजनेतून युवकांना पाठबळ दिले जात आहे. लहान व्यवसायिकही आता मोठे उद्योग स्थापन करुन ग्रामीण भागातून शहरी भागात व्यवसाय वाढवित आहेत. अशाच प्रकारच्या नवउद्योजकांना सक्षम करुन त्यांच्या पंखात आर्थिकदृष्ट्या बळ आणण्याचे काम मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या मेळाव्यात बचत गटासह जिल्ह्यातील लघु, सुक्ष्म, मध्यम अशा सर्व प्रकारचे उद्योग सुरु करण्यासाठी तसेच ते मोठे बनवण्यासाठी 2 कोटी रुपयांपर्यंतचा पतपुरवठा करण्यासाठी आवश्यक सर्व योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली देण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा मेळावा आयोजित करुन या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक घरात शासकीय योजनांची माहिती पोहचवण्यासाठी प्रयत्न करुया.

या कर्ज मेळाव्यास कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ, मत्स्य व्यवसाय कार्यालय (तांत्रिक), दुग्धविकास विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महिला आर्थिक विकास महामंडळ, तालुकास्तरीय बँक प्रतिनिधी, सर्व बँका, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.), जिल्हा रेशीम उद्योग विभाग, समाज कल्याण विभाग, संचालक- आरसेटी आदी विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. कर्ज मेळाव्यास संबंधित विभागाचे अधिकारी- कर्मचारी त्यांच्या योजनांचे माहिती पत्रक, कर्ज मागणी अर्ज व इतर आवश्यक माहितीसह उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *