बातमी

चांगभलंच्या गजरात वाघापूरात ज्योतिर्लिंग जागर उत्साहात संपन्न

मडिगले(जोतीराम पोवार)– वाघापूर तालुका भुदरगड येथे शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला गेली आठ दिवस चाललेल्या नवरात्र उत्सवात भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रमासह माऊलींच्या अश्व रिंगण सोहळ्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला जागरा निमित्त हजारो भाविकांनी ज्योतिर्लिंग तसेच विठ्ठलाई पालख्यांच्यावर गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण केली यावेळी महिला लेझीम पथकाने उपस्थितांची मने जिंकली याचबरोबर मर्दानी खेळाच्या चित्तथरारक कसरती सादर करण्यात आल्या यावेळी स्थानिक देवस्थान समितीच्या वतीने महिला लेझीम पथका सह पालखीचे मानकरी तसेच नवरात्र उत्सव काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा समितीच्या वतीने मानाचे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कृष्णात डोणे पुजारी यांनी भाकणूक केली भाकणगीचा संक्षिप्त घोषवारा…………….. आरक्षणाच्या नावाखाली शासन मजा बघेल…. पाण्यासाठी आंदोलन होतील……, शेतीचा भाव वाढत जाईल….. ऊसाला ४००० हजार म्हणता म्हणता…३,६०० दर मिळेल………… मेघयान मळा अमृताच्या धारा मेघ उदंड हाय बांधा आड बांध शिवा आड शिव,मेघ गैरहंगामी हाय, पाऊस पाणी बदलत जाईल, द्रोनागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा हाय, दुनिया नेहाळू लागलाय, त्याच्या मागे अंधार म्होरं अंधार पडलाय, कोल्हापूर हे राजघराणे क्षत्रिय वंशाचा हाय, धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा, वाघापूर गावचा महिमा वाढत जाईल, पहिला मोगरा धूपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, तिसरा मोगरा राज्य करील, कुरी मिरवल, बांधा आड बांध शिवा आड शिव, रोहिणीचा पेरा त्याला मोत्याचा तुरा, रोहिणीची पेरणी त्याला हादग्याची पुरवणी होईल, पिवळ धान्य माध्यम पिकल, रसयान धान्य उदंड पिकल, मोलाना विकल, दीड महिन्याचे धान्य पिकल, पांढरे धान्य उदंड पिकल, तांबडी रास मध्यम पिकल, मोलान विकल, गव्हाची पेंडी मध्यम पिकल, ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल, धान्य दारात वैरण कोण्यात ठेवशीला, वैरण सोन्याची होईल, सांभाळून ठेवा, वैरण धान्याच्या चोऱ्या होतील, सांभाळून ठेवा, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, कोंबडा मनुष्याच्या पाठी लागल, धनगराचा बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल, मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय, जग दुनियेत एक मोठं नवल होईल, मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल,

उसाचा काऊस होईल, सडक वर पडल ४००० हजार म्हणता म्हणता ३८०० वर येईल ३८०० म्हणता म्हणता ३६०० वर येईल साखरेचा भाव तेजी मंदित राहील, गुळाचा भाव उच्चांक ठरेल, उसाच्या कांड्याने आन दुधाच्या भांड्यांना राज्या राज्यात आंदोलन होईल, शुगर फॅक्टरी चा मॅनेजर आनंदात राहील, साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, साखर कारखान्याचे राजकारण ढवळून जाईल, व्यापारी लोक शेतकऱी वर्गाची लबाडणूक करतील, दुनिया पेटल ,काळरात्र येईल, मायेच लेकरू मायीला ओळखायचं नाही, गायीचं वासरू गाईला भेटणार नाही, घरातून गेलेला माणूस परत येईल आशा धरू नका, ठेचला मरण हाय, हातातील भाकरी मनुष्याच्या हातात राहील, पाण्याचा कप विकत मिळल, अठरा तरेचा मनुष्याला आजार होईल, डॉक्टर लोक हात टेकतील, आड चूकल खरं खेडं चुकणार नाही, कोरोना पेक्षा मोठी महामारी येईल, विज्ञानाची प्रगती परावलंबी होईल, विज्ञानाची प्रगती मनुष्याला घातक होईल, राजकारणात मोठा गोंधळ होईल,

सत्ता संपत्तीच्या माग लागतील, सत्तेच्या राजकारणात राजकीय नेता तुम्हाला विकत मिळल, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, छोटे पक्ष आघाडी घेतील महाराष्ट्र राजकारणाचं सिंहासन दळमळीत राहील, राजकारणात पैसा खाणारा सापडणार नाही, राजकीय नेते मोठमोठ्या घोटाळ्यात अडकून पडतील, सीमा भागाचं राजकारण ढवळून जाईल, अतिरेकी लोक येतील, शहराला लागून असलेली शहरे उद्ध्वस्त होतील,जगातील अनेक देश एकमेकांशी लढाई खेळतील, युद्धाचा भडका होईल, येईल येईल कापाकापी, माणसाला माणूस खाऊन टाकलं, दागिने पैसा मनुष्याला घातक होईल, सांभाळून राहावा, दिवसाढवळ्या डाक दरोडे पडतील, भारत पाकिस्तान यांचं छूप युद्ध होईल, बारा वर्षाची मुलगी आई होईल, तरुण पिढी वाम मार्गाला लागल, लाच लुचपत भ्रष्टाचाराला देशात उत येईल,

संप हरताळाची पाळी आपल्या देशावर येईल, नोकरवर्ग समाज खाईल, आरक्षणाच्या नावाखाली शासन मजा बघेल, समा समाजात भांडणं लावल, देशात एक मोठा कायदा येईल, एक औत चौघात होईल, शेतीचा भाव वाढत जाईल, कुणब्याच्या बाळाला मोठा विचार पडलाय, उन्हाळ्याचा पावसाळा होईल, पावसाळ्याचा उन्हाळा होईल, मेघाची तुम्ही वाट बघशीला, नदी बाईला कुलप पडतील, पाण्यासाठी मोठी आंदोलन पेटतील, काळ्या खडकाच्या लाह्या होतील, भूकंप होतील, शिवाजी महाराजांचा तुम्ही जय जयकार करशीला, शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येईल, भगवा झेंडा राज्य करेल…. यावेळी बाबुराव डोणे पुजारी यांच्यासह शिवाजी गुरव तसेच पुजारी वर्ग देवस्थान समितीचे अध्यक्ष बापूसो रामचंद्र आरडे यांच्यासह सर्व समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

One Reply to “चांगभलंच्या गजरात वाघापूरात ज्योतिर्लिंग जागर उत्साहात संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *