बिद्रीच्या निवडणूकीतील सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचा वाघापुरातून प्रचार शुभारंभ
मडिलगे (जोतिराम पोवार) : मागील सात वर्षे राज्यात उच्चांकी उस दर देणाऱ्या आणि विविध प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या बिद्री साखर कारखान्याची बदनामी करणाऱ्या विरोधी मंडळींना मते मागण्याचा अधिकार नाही. राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेल्या आणि कारखान्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना या निवडणूकीत धडा शिकविण्याची वेळ आली आहे. सुज्ञ सभासदच त्यांना या निवडणूकीत खड्यासारखे बाजूला करतील, असे मत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी गटाच्या श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ वाघापूर ( ता. भुदरगड ) येथील ज्योतिर्लिंग देवालयात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.
यावेळी बोलताना आम. सतेज पाटील म्हणाले, बिद्री साखर कारखान्याचे राज्यात उच्चांकी सभासद आहेत. एवढ्या मोठ्या संस्थेच्या सभासदांचा विश्वास मिळविणे सोपे नाही. परंतु अध्यक्ष के. पी. पाटीलकी यांनी मागील २० वर्षांत कारखान्याच्या सर्वच घटकांचा विश्वास जिंकण्याचे काम केले आहे. अशा विश्वासू माणसांच्या हातात बिद्री कारखाना राहणे आवश्यक आहे.
यावेळी बोलताना विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, सहवीज प्रकल्प उभारणीवेळी आपण कारखान्याचे पत्रे विकू अशी टिका झाली. परंतु या प्रकल्पाच्या यशस्वितेमुळे आपण बिद्रीला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले. इथेनॉल प्रकल्पाचे मंजूरी पत्र अडवणाऱ्या आम. आबीटकर यांना स्वतःच्या आमदारकीसाठी बिद्री कारखाना हवा आहे. परंतु बिद्रीचा सभासद सूज्ञ असून स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना ते कदापी थारा देणार नाहीत.
यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव, माजी आमदार संजय घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल देसाई, बिद्रीचे संचालक प्रविण भोसले, फत्तेसिंह भोसले ( नरतवडे ), माजी संचालक सुनील कांबळे, भिकाजी एकल, शरद पाडळकर, रिपब्लिकनचे पांडूरंग कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. उमेदवारांची ओळख विश्वनाथ कुंभार यांनी करुन दिली.
यावेळी बजरंग देसाई, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, प्रविणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, भैय्या माने, भोगावतीचे नुतन संचालक धैर्यशिल पाटील, गोकूळचे संचालक युवराज पाटील, रणजित पाटील ( मुदाळ ), शशिकांत पाटील-चुयेकर, अंबरिष घाटगे, मनोज फराकटे, सचिन घोरपडे, सुनील कांबळे, आघाडीचे सर्व उमेदवार यांच्यासह उस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश पाटील, विवेक गवळी यांनी केले तर आभार संचालक प्रविणसिंह पाटील ( मुरगूडकर ) यांनी मानले.
ए. वाय. गळाला लागले एवढेच विरोधकांना समाधान
बिद्रीसाठी के. पी.-ए. वाय. या मेव्हणा-पाहुण्यांतील संघर्ष मिटविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. यासाठी अनेक वेळा बैठका घेतल्या परंतू मिटवायचेच नाही म्हणून केवळ के. पी. द्वेषाने पछाडलेले ए. वाय. माझा शब्द डावलून आपल्याला सोडून गेले. परंतु यामुळे कारखान्याच्या सत्तेवर काहीच फरक पडणार नसून येत्या ५ तारखेला मतदारच मतपेटीतून उत्तर देतील. निकालानंतर विरोधकांना ए. वाय. आपल्या गळाला लागले एवढेच समाधान मिळेल अशी खोचक टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर केली.