बातमी

कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वाचन चळवळीला गती देणार – पालकमंत्री दीपक केसरकर

विविध विषयांवरील पुस्तके खरेदीची वाचकांना संधी

कोल्हापूर : वाचन संस्कृती रुजण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवून वाचन चळवळीला गती देणार असल्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ कादंबरीकार दि.बा. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी सुहास गाडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तानाजी मगदूम, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह विनोद कांबळे, कवी विसूभाऊ बापट आदी उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाच्या स्टॉलचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मराठी भाषेचे कार्य अधिक जोमाने होण्यासाठीही नियोजनबद्ध प्रयत्न सुरु आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

जिल्हा वार्षिक योजनेतून शाळांना पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येणार असून कोल्हापूर जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजनेतून सुमारे अडीच कोटी रुपयांची पुस्तके शाळांच्या ग्रंथालयांना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील पुस्तकांचे गाव भिलार प्रमाणे राज्यात पुस्तकांची गावे तयार करणे तसेच राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सवाप्रमाणे अन्य उपक्रम राबवून ग्रंथ वाचन चळवळीला बळ देण्याचे काम मराठी भाषा विभागामार्फत होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ग्रंथोत्सव कार्यक्रमासाठी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमधील वाचन संस्कृतीत वाढ होण्यासाठी तसेच ग्रंथालय चळवळ व वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी प्रथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ उपलब्ध व्हावेत तसेच प्रकाशक व ग्रंथविक्रेत्यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी तसेच ग्रंथांचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने ग्रंथोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदानवाढ, गाव तिथे ग्रंथालय या योजनेअंतर्गत ज्या गावामध्ये सार्वजनिक ग्रंथालय नाहीत त्या गावांमध्ये ग्रंथालयांना नवीन मान्यता देण्याबाबत आणि दर्जावाढीबाबत शासनस्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत.

ग्रंथोत्सवासारखे विविध कार्यक्रम राबवून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया. ग्रंथोत्सवातील पुस्तक प्रदर्शनातून किमान एकतरी पुस्तक प्रत्येकाने खरेदी करावे, असे आवाहन करुन या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृती रुजवण्याची गरज – ज्येष्ठ कादंबरीकार दि.बा.पाटील

ज्येष्ठ कादंबरीकार दि.बा.पाटील म्हणाले, समाजाला सुसंस्कृत चेहरा देण्याचे काम ग्रंथ करतात. व्यक्तीला शिक्षित आणि सुसंस्कृत घडवण्याचे काम साहित्य करते. याचसाठी राज्यातील साहित्यिकांनी वाचन संस्कृतीला बळ देण्याचे काम करावे. समाजात वाढत चाललेली विकृती, मोबाईलचा होणारा गैरवापर हे चित्र बदलण्याचे काम ग्रंथच करु शकतात. यासाठी सध्याच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याची गरज आहे. गावागावातील नागरिकांमध्ये पुस्तके, ग्रंथ वाचनाची संस्कृती रुजवण्यासाठी ग्रंथोत्सवाचे कार्यक्रम ग्रामीण भागात घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ज्ञानाचा सर्वात चांगला स्त्रोत म्हणजे पुस्तके, ग्रंथ आहेत. ग्रंथांचा वापर हा केवळ कपाटात किंवा देव्हाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी न करता त्याचे नियमित वाचन करुन अधिकाधिक ज्ञान ग्रहण करावे. जीवनात येणाऱ्या अडचणीच्या संकटाच्या काळात अचूक निर्णय घेण्याचे ज्ञान आपल्याला पुस्तके देतात. म्हणूनच प्रत्येकाने वाचनाची आवड जाणीवपूर्वक जोपासावी. तसेच विविध विषयांशी संबंधित वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचून अधिकाधिक ज्ञान मिळवा, असे सांगून मुलांमध्ये पुस्तक वाचनाची सवय निर्माण होण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी प्रास्ताविकातून ग्रंथोत्सव आयोजनामागील हेतू विशद केला. शाहू स्मारक भवन येथे 10 डिसेंबर पर्यंत असणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनातून वाचकांनी ग्रंथ खरेदी करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे आनंद शिंदे यांनी आभार मानले. दरम्यान सकाळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक किरण गुरव यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करुन ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *