आदेश दिनांक ०९ / १२ / २०२२ रोजी सकाळी ०७.०० वा. पासून ते दिनांक २३/१२/२०२२ रोजी रात्री २४.०० वा. पर्यंत अंमलात राहील.
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या हद्दीत कन्नड वेदीका संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य करुन नुकसान करणेत आले आहे. त्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर जिल्हयातील काही पक्ष/संघटना यांचेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटून महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणारे व रहिवासी असलेल्या कन्नड भाषीकांना लक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तणावपूर्ण वातावरणात कोल्हापूर जिल्हा बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
शनिवारी दिनांक १० / १२ / २०२२ रोजी कर्नाटक सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून तीव्र आंदोलन करणेत येणार असून या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. महाविकास आघाडी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते हे दिनांक १० / १२ / २०२२ रोजी राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ कोल्हापूर येथे एकत्रित जमून निषेध व्यक्त करणार आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सिमावाद न मिटलेस कोल्हापूरसह महाराष्ट्र बंद देखील करण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणेकरिता, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (The Maharashtra Police Act, 1951) चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केला आहे.