मडिलगे( जोतीराम पोवार): कोरोणा व्हायरस हद्दपार होईल, चांदी ,गुळाचे भाव उच्चांक गाठतील,स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल, इतर राज्यातील निवडणुकांत कमळ उमलेल, ऊसासाठी आंदोलन होईल
वाघापूर ता. भुदरगड येथे महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिर्लिंगा चा जागर चांगभलंच्या गजरात मोठ्या उत्साहात व भक्तीभावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोजक्याच मानकर्याच्या उपस्थितीत पार पडला. तत्पूर्वी आनंदा पाटील, बाजीराव पाटील यांच्या घरातील घट हलवण्याचा विधिवत सोहळा पार पडल्यानंतर ज्योतिर्लिंग मंदिरातील घट हलवण्यात आला. वालंग झाल्यानंतर आण्णाप्पा डोणे पुजारी यांनी नाथांची पहिली भाकणूक कथन केली. यानंतर ज्योतिर्लिंग व विठ्ठलाई यांच्या पालख्यांवर भाविकांनी मुक्तपणे गुलाल खोबऱ्याची उधळण केली यावेळी शिवाजीराव गुरव, डॉ. मा. ग. गुरव, शिवप्रसाद गुरव यांनी श्रींची आकर्षक पूजा बांधली होती. यावेळी डोणे यांनी सांगताना संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरणा विषाणू विषयी सांगताना सर्व जनतेला सुखात ठेवत कोरोना व्हायरस पायाशी घेत त्याला गाडून टाकणार असल्याचे कथन करताना सांगितले द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा आहे दुनिया न्याहाळू लागलाय, कोल्हापूरचं राजघरान क्षत्रिय वंशाच हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा, पिंजऱ्यातील राघू भाषण करेल, पहिला मोगरा धूपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, तिसरा मोगरा राज्य करेल, कोकणात कुरी मिरवेल, बांदा आड बांध शिव, शिवा आड शिव, रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा, तांबडं धान्य माध्यम पिकल, पांढर धान्य उदंड पिकल,एक महिन्यात येईल असं धान्य पिकल, धान्य दारात वैरण कोण्यात, वैरण सोन्याची होणार, सांभाळून राहावा, ज्याच्या घरी धान्य त्यो शहाणा होईल, गव्हाची पेंडी मध्यम पिकल, धान्य वैरण काडीची चोरी होत राहील, भोळा शंकर विठ्ठल बिरू देवा चा धावा करेल गारान घालेल, कोरोणा व्हायरस माझ्या पायाशी घेईल त्याला गाडून टाकीन सर्व जनतेला सुखी ठेवीन, कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठे भगदाड पडेल, कर्नाटक राज्याचा चौथाई कोणा ओसाड पडेल, उसाच्या कांड्यान व दुधाच्या भांड्यांन राज्यकर्ते गोंधळून जातील, बारा वर्षाची मुलगी आई होईल,नीतिमत्तेचा खेळ बदललाय, उगवत्या सूर्याला संकट पडलय, दिवसा दरोडे पडतील, नदीकाठची जमीन ओसाड पडेल, पाकिस्तान राष्ट्राशी लढत करावे लागेल त्यांचा चौथाई कोणा ओसाड पडल, उसाचा काऊस होईल, सडकवर पडल, मिळणार नाही, उसासाठी आंदोलन होईल, जाळपोळ होईल, गुळाचा भाव उच्चांक गाठेल, साखरेचा भाव तेजी-मंदीत राहील, तंबाखूची पेंडी माध्यम पिकल, तंबाखूपासून तरुण पिढी बरबाद होईल, सीमाप्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील, निपाणी भागात अतिरेकी गोंधळ घालतील जाळपोळ होईल, मायेच लेकरू मायला ओळखणार नाही, गाईचं वासरू गाईला भेटणार नाही, वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला, उशाची भाकरी उशाला राहील, चांदीचा भाव वाढत राहील, स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल, राजकीय नेते सत्ता संपत्ती च्या पाठीमागे लागतील, राजकारणात लोक देवाला विसरून जातील, दिल्लीच्या गादीला धक्का बसेल, दिल्ली शहराचे मोठे नुकसान होईल, आंतरराष्ट्रीय जागतिक बाजारपेठ बंद पडल, मुस्लीम राष्ट्र उद्ध्वस्त होतील, जगाच्या नकाशात देश पुसून जाईल, बारा कोसाला एक दिवा दिसल, बारा वर्षाचे बालपण येईल, तेवीस वर्षाच तरुण पण येईल, पस्तीस वर्षाच म्हातारपण येईल मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल, नदी चा माळ, माळाची नदी होईल, समुद्रातील संपत्ती नाश पावेल, काही वर्षात सूर्य चंद्र एकत्र येतील सूर्य चंद्राची टक्कर होईल, पृथ्वी गडप होईल, भूकंप होतील, रेल्वेचे मोठे अपघात होतील, मेघाची वाट बघशिला, शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येईल, तिरंगा झेंडा भंगाला जाईल, इतर राज्यातील निवडणुकांत कमळ उमलेल, काँग्रेस पक्ष सत्तेपासून वंचित राहील.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष अरविंद जठार उपाध्यक्ष सदाशिवराव दाभोळे,सरपंच दिलीप कूरडे,पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, सचिव रावसाहेब बरकाळे, बळीराम पाटील, भगवानराव डोणे पुजारी, नवलाप्पा डोणे, रावसाहेब डोणे, मायाप्पा डोणे, बिरदेव डोणे, संजय वाघमोडे यांच्यासह देवस्थान समितीचे सर्व सदस्य पुजारी वर्ग व मानाचे मानकरी उपस्थित होते.