बातमी

निसर्गाकडे चला तुम्हाला आत्मीक सुखाची अनुभूती मिळेल – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

शिवराजच्या हरितसेनेच्या ‘पर्यावरण सेवा योजना ‘ अंतर्गत  शिवारफेरीचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : निसर्गाकडे चला तुम्हाला आत्मीक सुखाची अनुभूती मिळेल . निसर्ग म्हणजे आनंद देणाऱ्या ज्ञानाचे भांडार आहे. निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांचा शारिरीक , मानसिक, बौध्दिक विकास घडून येतो असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले ते येथील शिवराज विद्यालयाच्या हरितसेनेच्या वतिने आयोजित ‘पर्यावरण सेवा योजना ‘ अंतर्गत  शिवारफेरी प्रसंगी विद्यार्थ्याना मार्गदर्शन प्रसंगी बोलत होते.

     विद्यार्थ्यांना परिसरातील वृक्षांची ओळख व्हावी. आपल्या परिसरातील असणाऱ्या जलस्रोतांची माहिती मिळावी . तसेच परिसरामध्ये पडणाऱ्या पावसाची मोजमाप कशी केली जाते ? परिसरात कोणकोणत्या रानभाज्या आढळतात ? या साऱ्याची माहिती मिळावी या उद्देशाने येथील शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगूडच्या हरितसेना विभागाच्या वतीने ‘पर्यावरण सेवा योजनेच्या अंतर्गत शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले.

हरितसेना समन्वयक शिक्षक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना परिसरात कोण कोणते वृक्ष आहेत ? त्यांची नावे काय आहेत ? ते कसे ओळखायचे ? त्यापैकी देशी कोणते ? विदेशी कोणते ? त्यांतील औषधी वनस्पती कोणत्या ? बाजारात विकत न मिळणाऱ्या रानभाज्या कोणत्या ? याची माहिती या शिवारफेरीतून विद्यार्थ्यांना देण्यात आली.

त्याच बरोबर पळस, करंज, सेंद्री ( बिक्सा ) रिटा , गुलमोहर, कॅसिया , चिंच , पर्ज्यन्य वृक्ष , कणेरी , साग आदी वृक्षांच्या हजारो बिया ही यावेळी जमा करण्यात आल्या. या शिवारफेरीत श्री सुर्यवंशी यांचे बरोबर आर ए जालिमसर व शिवराजच्या हरितसेनेचे ५० विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

ही फेरी शिवराय विद्यालय येथून सुरू होऊन , सुर्यवंशी कॉलनी , महाजन कॉलनी , मंडलिक महाविद्यालय शिंदेवाडी रोड , सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय बॉटॅनिकल गार्डन , आनंद आश्रम बंगला गार्डन, तलाव परिसर या मार्गावर आयोजित केली होती.

यावेळी कैलाशपती , बकुळ , रिटा, जारूल , पळस, पांगारा, काटेसावर चंदन , सुपारी, सेंद्री, मोरआवळा, राईआवळा, बेहडा, अर्जुन, करंज, शिरीष , शिसम , सिल्व्हर ओक , गुळभेंडी पिचकारी, बहावा , निलमोहर, सातवीण, सिता अशोक , बेल आदी विद्यार्थ्यांना अपरिचीत असलेल्या वृक्षांची विद्यार्थांना नव्याने माहिती मिळाली . तसेच आघाडा , काटेमाठ , टाकळा बाभुळ , गोजिभ, उंबर , टिक्याचापाला ( दगडीपाला), कोवळा फणस , केळीचा कोका , तांदुळजा  आदी रानभाज्याची माहिती ही यावेळी विद्यार्थांना देण्यात आली.

शेवटी सरपिराजीराव तलाव परिसरात असलेल्या पर्जन्यमापक यंत्राची माहिती व मुरगूड यमगे व शिंदेवाडी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सर पिराजीराव तलावाच्या जलस्रोताची माहिती घेण्यात आली. निसर्गाच्या सानिध्यात रमत – गमत या आनंददायी व मार्गदर्शन पर शिवार फेरीचा विद्यार्थांना एक नाविन्यपूर्ण अनुभव मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *