लेख

स्वातंत्र्य सेनानी कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे : निष्ठा, त्याग आणि दूरदृष्टीचा महामेरू – डॉ. अशोक ढवळे

             १ ऑक्टोबर २०२३ रोजी, मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षी आणि स्वातंत्र्यसेनानी व माजी खासदार कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या १५व्या स्मृतिदिनी बीड जिल्ह्यात मोहा या त्यांच्या गावी त्यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी खासदार सीताराम येचुरी यांच्या हस्ते संपन्न झाला. कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे हे मराठवाड्याच्या डाव्या चळवळीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्रातील एक शीर्षस्थ नेते होते.

स्वातंत्र्यलढ्याचे बाळकडू

२९ डिसेंबर १९१९ रोजी अप्पांचा जन्म मोहा या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. अंबाजोगाई येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण आणि नांदेड येथे कमाध्यमिक शिक्षण घेतले. तेव्हा मराठवाड्यात हैद्राबादच्या निजामाचे जुलमी राज्य होते. अप्पा शाळेत असताना ‘वंदे मातरम’ या गीताला निजामाच्या संस्थानात बंदी होती, ती अप्पा व त्यांच्या सहकारी मित्रांनी तोडली.

१९४२ ला महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारला ‘भारत छोडो’चा इशारा दिला. या देशव्यापी आंदोलनाचा प्रभाव मराठवाड्यातही वेगाने पसरला. मराठवाड्यात निजामाचे शासन ब्रिटिश सरकारच्या आधीन होते. अंबाजोगाईत एका उंच बुरूजावर निजाम शासनाचे रेडिओ केंद्र होते. अप्पा व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन ते उद्ध्वस्त केले. अंबाजोगाई पोलीस कचेरी आणि पोस्ट ऑफिसवरील निजामाचा झेंडा काढून त्यांनी भारताचा तिरंगा झेंडा फडकवला. अनेकांना अटक झाली, पण अप्पा निजाम सरकारच्या हाती लागले नाहीत. १९४२ मध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या अंबाजोगाईच्या योगेश्वरी विद्यालयातून अप्पा मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. या शाळेत देशप्रेमाने भारावलेले संस्थाचालक आणि शिक्षक असल्यामुळे अप्पा यांच्यासारखे अनेक विद्यार्थी पुढे स्वातंत्र्यलढ्यात आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झाले.  

मराठवाड्यात तेव्हा उच्च शिक्षणाची सोय नव्हती. म्हणून अप्पा यांनी १९४३ मध्ये उच्च शिक्षणासाठी हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तेव्हाचे हैद्राबाद हे लवकरच सुरू होणाऱ्या तेलंगणच्या शेतकऱ्यांच्या सशस्त्र लढ्याचे प्रत्यक्ष नसले तरी राजकीय केंद्र होते. तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अनेक लढवय्ये सुद्धा हैद्राबादमध्ये उच्च शिक्षण घेत होते. या दोन्ही चळवळींवर कम्युनिस्ट पक्षाचा मोठा प्रभाव होता. मार्क्सवादी विचारांवर येथे गुप्तपणे शिबिरे, चर्चासत्रे, ग्रंथवाचन इत्यादी नियमितपणे व्हायचे. या मंथनातूनच अप्पा, आर. डी. देशपांडे, व्ही. डी. देशपांडे, चंद्रगुप्त चौधरी, वसंत राक्षसभुवनकर, अतहर बाबर व इतर अनेक कार्यकर्ते कम्युनिस्ट चळवळीकडे आकर्षित झाले. १९४६ साली अप्पा कम्युनिस्ट पक्षात सामील झाले आणि त्यांनी शिक्षण सोडून देऊन पूर्णवेळ कार्यकर्ता बनून निजामविरोधी आंदोलनात उडी घेतली.

तेलंगणचा सशस्त्र लढा आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम

तेलंगणचा ऐतिहासिक सशस्त्र शेतकरी संग्राम जुलै १९४६ मध्ये सुरू झाला. कॉम्रेडस पी. सुंदरय्या, एम. बसवपुन्नय्या, सी. राजेश्वर राव, एम. चंद्रशेखर राव, डी. वेंकटेश्वर राव, बी. नरसिंह रेड्डी असे कम्युनिस्ट पक्षाचे आणि किसान सभेचे पुढारी त्याचे समर्थ नेतृत्व करत होते. १९४६ ते १९४८ या काळात हा अभूतपूर्व लढा निजामाचे शासन व त्याच्या सशस्त्र रझाकारांच्या विरुद्ध लढला गेला, आणि १९४८ ते १९५१ या काळात खुद्द कॉँग्रेसच्या नव्या केंद्र सरकारच्या लष्कराने हा लढा चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला.

या संघर्षात कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचे ४,००० हून अधिक शेतकरी-शेतमजूर कार्यकर्ते ठार झाले, १०,००० कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना प्रत्येकी ३-४ वर्षे तुरुंगवास झाला, ५०,००० कार्यकर्त्यांना अटक करून त्यांचा छळ झाला, हजारों महिलांवर अनन्वित अत्याचार झाले, आणि लाखों लोकांची करोडों रुपयांची मालमत्ता जप्त झाली. पण दुसरीकडे या तेजस्वी लढ्यात खम्मम, नलगोंडा, वारंगळ व इतर काही जिल्ह्यांतील तब्बल ३,००० गावांत ग्राम राज्य स्थापन करण्यात आले, त्याद्वारे जमीनदार-सावकारांच्या एकूण १० लाख एकर जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आणि भूमिहीन शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांना त्यांचे मोफत फेरवाटप करण्यात आले. म्हणूनच हा लढा भारतीय शेतकरी संघर्षांच्या इतिहासात कायमचा सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.  

इतक्या जबरदस्त लढ्याचा परिणाम जवळच्या मराठवाड्यावर पडणे साहजिकच होते. त्यामुळे मराठवाड्यातही निजामविरोधी सशस्त्र लढा उभारण्याचे कम्युनिस्ट पक्षाने ठरविले. अप्पा आणि आर. डी. देशपांडे यांनी नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्याच्या टेळकी या गावापासून त्याची सुरुवात केली. त्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन डॉ. विठ्ठल मोरे यांनी “मार्क्सवादी कर्मयोगी” या अप्पांच्या चरित्रात केले आहे. अप्पा व देशपांडे यांना अटक करून नांदेड, परभणी व नंतर निजामाबादच्या तुरुंगात डांबून ठेवण्यात आले. अप्पा आधी भूमिगत असताना व नंतर तुरुंगात असताना त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. अप्पांना त्यांचे अंत्यदर्शन घेण्याची संधी सुद्धा मिळाली नाही.
अप्पांचे जिवलग मित्र व कॉम्रेड वसंत राक्षसभुवनकर हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर भागात कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करत होते. १६ नोव्हेंबर १९४७ रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी वैजापूर तालुक्याच्या भावठाण गावच्या पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. त्यात निजामाच्या पोलिसांनी वसंतना गोळ्या घालून ठार केले. मराठवाड्यातील कम्युनिस्ट चळवळीवर आणि व्यक्तिशः अप्पांवर तो मोठा आघात होता.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी मराठवाडा स्वतंत्र झाला नाही. तो अजूनही निजामाच्या टाचेखालीच होता. हैद्राबादचा निजाम आपले संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या तयारीत असल्याची खबर मिळाल्यामुळे १३ सप्टेंबर १९४८ रोजी भारत सरकारने आपले लष्कर हैद्राबादला पाठवले, १७ सप्टेंबर रोजी निजाम शरण आला, आणि मराठवाड्यासह निजामाच्या राजवटीखाली असलेला सर्व प्रदेश मुक्त झाला. पण कॉंग्रेसच्या केंद्र सरकारने आणखी एका कारणामुळेही आपले लष्कर हैद्राबादमध्ये घुसवले होते हे लवकरच स्पष्ट झाले. कम्युनिस्ट पक्षाच्या आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला तेलंगणच्या शेतकऱ्यांचा जमीनदारविरोधी सशस्त्र संग्राम चिरडण्यासाठी सुद्धा त्याने आपले लष्कर पाठवले होते. तरीही शेतकऱ्यांचा हा सरंजामशाहीविरोधी लढा बलाढ्य भारतीय सेनेविरुद्ध तीन वर्षे सुरूच राहिला, आणि ऑक्टोबर १९५१ मध्ये अखेर तो मागे घेण्यात आला.  

कॉंग्रेस पक्षानेही तेलंगण, आंध्र, मराठवाडा ह्या भागात आणि देशभरच भांडवलदार-जमीनदारवर्गांना पाठिशी घालून कम्युनिस्ट पक्षाला आपले मुख्य शत्रू मानले. त्यामुळे गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे अशा नेत्यांनी कॉंग्रेस सोडली आणि ‘लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्स’ या संघटनेची स्थापना केली. १९५२ साली कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या जनता लोकशाही आघाडीत ही लीग सामील झाली, आणि पहिल्या लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात कॉँग्रेसचा पराभव करून बाबासाहेब परांजपे खासदार म्हणून निवडून आले.
तेलंगणमध्ये तर शेतकऱ्यांच्या शौर्यशाली लढ्याच्या परिणामी १९५२ साली लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकींत कॉंग्रेसचा फडशा पाडून कम्युनिस्ट पक्षाचे अनेक उमेदवार खासदार व आमदार म्हणून निवडून आले. कम्युनिस्ट पक्षाचे नेते रवी नारायण रेड्डी हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक मताधिक्याने खासदार म्हणून निवडून आले – पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा सुद्धा त्यांना जास्त मताधिक्य मिळाले!

 एक असामान्य कम्युनिस्ट व किसान नेते

स्वातंत्र्यप्राप्ती आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या विजयानंतर अप्पांनी सुरुवातीची काही वर्षे बीड जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या बांधणीच्या व विकासाच्या कार्यास स्वतःला वाहून घेतले. मोहा या त्यांच्या गावापासूनच त्यांनी प्रारंभ केला. त्या काळात मोहा गावच्या आसपास घनदाट जंगल असे. हिंस्त्र श्वापदे तेथे मुक्त संचार करीत असत. एकदा एक बिबट्या गावाच्या जवळपास आल्याची हाकाटी उठली. अप्पा आणि रंगनाथ देशमुख हातात कुऱ्हाडी घेऊन जवळच्या जंगलात गेले. तेथे लपलेल्या वाघाने अप्पांवर अचानक झडप घातली आणि दोहोंमध्ये झुंज सुरू झाली. अप्पा रक्तबंबाळ झाले. पण अखेर अप्पांनी वाघावर कुऱ्हाडीने निर्णायक घाव घातला आणि वाघ कोसळला. अप्पा व रंगनाथ हे दोघेही गंभीर जखमी झाले. पण गावकऱ्यांनी अतिशय प्रभावित होऊन हे दोघे आणि मेलेला वाघ यांची गावातून मिरवणूक काढली. अप्पांना बरे व्हायला खूप वेळ लागला, पण या घटनेमुळे जनमानसावर त्यांचा ठसा कायमचा उमटला.

त्यानंतरच्या काळात अप्पांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेचा प्रभाव बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात उत्तरोत्तर वाढत गेला. कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवा आणि महिला संघटना यांची कालांतराने स्थापना झाली. बीड जिल्ह्यात, मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात अनेक लढे झाले, त्या सर्वांचा उल्लेख या एका लेखात करणे अर्थातच शक्य नाही.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बीड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील शेकडो लढाऊ व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या संचाशिवाय अर्थातच अप्पांना हे सर्व शक्य झाले नसते हे उघड आहे. त्यातील अनेक कार्यकर्ते अप्पांनीच खूप परिश्रम घेऊन घडवले याचे आम्ही काही जण साक्षीदार आहोत.

त्या काळात माकप व किसान सभेच्या महाराष्ट्रातील प्रभावी ग्रामीण संचाचे नेतृत्व अर्थात गोदावरी परुळेकर यांच्याकडे होते, आणि या संचात माजी खासदार गंगाधर अप्पा बुरांडे, नरेंद्र मालुसरे, माजी खासदार रामचंद्र घंगारे, माजी आमदार विठ्ठलराव नाईक, कृष्णा खोपकर, एल. बी. धनगर, माजी खासदार व माजी आमदार लहानू कोम, अशा दिग्गज नेत्यांचा समावेश होता.

बीड जिल्ह्यात अप्पांसोबत माकपच्या पहिल्या फळीच्या लढाऊ संचात आर. डी. देशपांडे, गुंडाप्पा जिरगे, बापूसाहेब देशमुख, हमीद हुसेन, यशवंतराव माने, मारोतराव साखरे, गणपतराव घाटूळ, मोतीराम जगताप, नानासाहेब पोकळे, मुर्गाप्पा खुमसे, भानुदास देवरवाडे, हवाप्पा क्षीरसागर, प्रभूअप्पा मिसाळ, निवृत्ती कांबळे, रंगरावमामा देशपांडे, राम मुकादम, भागवतराव नखाते मास्तर, काशीनाथराव मुकादम, कुंवरलाल यादव, डॉ. पांडुरंग जोशी अशा अनेक जणांचा समावेश होता.

अप्पांचा बहुआयामी जीवनपट

१९५५ साली त्यांनी मोहा येथे अप्पांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अधिवेशन. गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतला. १९५६ ते १९७५ दरम्यान ते मोहा गावच्या सरपंचपदी सातत्याने निवड. १९७२ पर्यंत गावच्या निवडणुका बिनविरोध होत असत. १९५७ साली त्यांची निवड बीड जिल्हा लोकल बोर्डावर झाली. १९६०वर्षी त्यांनी महाराष्ट्र शिक्षण संस्थेची स्थापना आणि तिच्यातर्फे महाराष्ट्र विद्यालय, मोहा, व इतर शाळांची स्थापना व विकास. त्याच वर्षी महानंदाताईंशी विवाह. १९६२ वर्षी त्यांची बीड जिल्हा परिषदेवर निवड झाली. १९६२ ते १९६४ त्यांनी आंदोलनामुळे तुरुंगवास भोगला. जेव्हा १९६४ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना आणि त्याच्या पहिल्या महाराष्ट्र राज्य कमिटीवर अप्पांची निवड झाली. वर्ष १९६७ मध्ये ते बीड जिल्ह्यातून खासदार म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडले गेले. १९६९ मध्ये त्यांनी माकप-प्रणीत महाराष्ट्र राज्य किसान सभेचे मोहा येथे स्थापना अधिवेशन घेतले, त्यात राज्य उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९७२-७३ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील भयानक दुष्काळाविरुद्ध संयुक्त लढा दिला. १९७५-७७ – कॉँग्रेस सरकारतर्फे देशांतर्गत आणीबाणी आणि अप्पांसह विरोधी पक्षांच्या हजारों कार्यकर्त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ मध्ये आणीबाणी नंतरच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार म्हणून अप्पांची निवड, त्याच निवडणुकीत मुंबईतून अहिल्या रांगणेकर आणि डहाणूतून लहानू कोम यांची पक्षाचे खासदार म्हणून निवड. १९७८ साली अप्पा खासदार असताना कॉँग्रेसी गुंडांच्या प्राणघातक हल्ल्यातून ते बचावले. त्याच वर्षी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात खासदार अप्पा आणि आमदार विठ्ठलराव यांच्यातर्फे दलितांचे धैर्याने संरक्षण केले आणि नामांतराच्या बाजूने आंदोलन केल्यामुळे त्यांना तुरुंगवास झाला. १९८० मध्ये जळगाव ते नागपूर संयुक्त राज्यव्यापी शेतकरी दिंडीत देखील ते सहभागी झाले.  १९८२ साली बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन झाले, त्यात पक्षाच्या राज्य सचिवमंडळावर त्यांची निवड झाली. १९८५ मध्ये त्यांनी समाजवादी सोविएत युनियनचा दौरा केला. १९९२ मध्ये गंभीर दुष्काळाविरुद्ध माकपच्या वतीने काढलेल्या मराठवाड्याच्या पायी जथ्याचे त्यांनी नेतृत्व केले. १९९३ मध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या खामगाव येथील राज्य अधिवेशनात राज्य अध्यक्ष म्हणून अप्पांची निवड करण्यात आली. पुढे १९९५ साली महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वर्धा येथील राज्य अधिवेशनात राज्य अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली. १९९६ मध्ये त्यांच्या योगदानाबद्दल  अंबाजोगाईत गोविंदभाई श्रॉफ यांच्या हस्ते जंगी अमृत महोत्सवी सत्कार झाला. १९९७ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या औरंगाबाद येथील राज्य अधिवेशनात राज्य नियंत्रण आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड.  १ ऑक्टोबर २००८ साली वार्धक्याने त्यांचे निधन झाले.

अप्पांची काही खास वैशिष्ट्ये                  

अप्पांची माझी पहिली भेट झाली ती १९८१ साली माझी एस.एफ.आय.च्या राज्य सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर मी बीड जिल्ह्यात गेलेल्या एस.एफ.आय.च्या एका शिबिरात. “भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास” हा विषय त्यांनी उत्कृष्टपणे स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे घेतला हे मला आजही आठवते. पुढे १९८७ साली पक्षाच्या राज्य कमिटीवर आणि १९९३ साली किसान सभेच्या राज्य कौन्सिलवर माझी निवड झाल्यानंतर अप्पांशी माझे संबंध जास्त दृढ झाले. त्यांच्याशी झालेल्या चर्चातून त्यांच्याविषयी असलेला आदर जास्तच वाढत गेला.    मी या लेखाचे शीर्षक “निष्ठा, त्याग आणि दूरदृष्टीचा महामेरू” असे दिले आहे. आणि हीच आहेत अप्पांची तीन खास वैशिष्ट्ये.

अप्पांची तत्त्वनिष्ठा वादातीत होती. मार्क्सवाद-लेनिनवादावर त्यांची निष्ठा डोळस आणि अढळ होती. साम्राज्यशाही, भांडवलशाही, सरंजामशाही, धर्मांधता, जातपातवाद, पुरुषप्रधानता यांच्या प्रत्येक आविष्काराविरुद्ध त्यांनी आयुष्यभर कडवी झुंज दिली. आज महाराष्ट्राचे भ्रष्ट व अनैतिक ‘खोके’ आणि ‘ईडी’ सरकार पाहून तर त्यांचे पित्त खवळले असते. सर्वच बाबतीत निषेधार्ह असलेल्या केंद्रातील मोदानी सरकारची त्यांनी सपशेल रेवडीच उडवली असती.      

अप्पांनी आमदारकीच्या अनेक आणि खासदारकीच्या काही निवडणुका स्वतः लढवल्या. पण निवडणुकीच्या राजकारणात पक्षाच्या तत्त्वांना आणि निर्णयांना त्यांनी कधीही बगल दिली नाही. कोणत्याही बाबतीत पक्षाच्या धोरणाविरुद्ध वागणाऱ्या कार्यकर्त्याला ते सरळ फैलावर घ्यायचे. अशा प्रसंगी उदारमतवाद त्यांनी कधीच दाखवला नाही. पक्षाची शिस्त मोडणे हा त्यांच्या लेखी गंभीर गुन्हा असायचा. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहाराला व भ्रष्टाचाराला त्यांनी कधीच माफ केले नाही. पक्षाचा पैसा काटकसरीने वापरणे, त्याचा हिशोब काटेकोरपणे ठेवणे, आयुष्यभर अत्यंत साधी राहणी ठेवणे, कम्युनिस्ट मूल्यांचे व नैतिकतेचे रक्षण करणे हे त्यांचे गुण जगजाहीर होते. त्यामुळेच कट्टर राजकीय विरोधक सुद्धा त्यांचा अपार आदर करत असत. चांगले निष्ठावंत कम्युनिस्ट कार्यकर्ते घडवण्यासाठी सातत्याच्या राजकीय-वैचारिक-संघटनात्मक पक्ष शिक्षणावर आणि स्वतःच्या वाचनावर त्यांचा नेहमीच विशेष भर असायचा.  

अप्पांच्या त्यागी वृत्तीचा प्रत्यक्ष अनुभव न घेतलेला त्यांना जाणणारा एकही कार्यकर्ता मराठवाड्यात नसेल. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हेच त्यांचे सर्वस्व होते. पक्ष घटनेत दिलेल्या प्रतिज्ञेचे ते स्वतः एक मूर्तिमंत उदाहरण होते. स्वातंत्र्यलढा आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या प्रभावाखाली स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडून ते १९४६ साली वयाच्या २७व्या वर्षी कम्युनिस्ट पक्षात सामील झाले, पूर्णवेळ कार्यकर्ते झाले, आणि अखेरपर्यंत तसे राहिले. खासदार असतानाही ते हमखास एस.टी. बसने वा रेल्वेने वा पायी फिरायचे. त्यांच्या अमृत महोत्सवी सत्काराच्या प्रसंगी त्यांना वाढत्या वयात फिरणे सोपे व्हावे म्हणून दिलेली मोटरगाडी त्यांनी क्वचितच वापरली. कार्यकर्त्यांच्या रास्त गरजा पूर्ण करण्याकडे मात्र त्यांनी नेहमीच कटाक्षाने लक्ष दिले.

महाराष्ट्र शिक्षण संस्था १९६० साली सुरू करणे, तिच्यामार्फत बीड जिल्ह्यात मोह्याच्या सुप्रसिद्ध महाराष्ट्र विद्यालयासकट विविध शाळा सचोटीने चालविणे, त्यातून चळवळीचे चांगले कार्यकर्ते जाणीवपूर्वक घडविणे, हे अप्पांच्या दूरदृष्टीचे आणखी एक ठळक उदाहरण आहे. ते या संस्थेकडे आणि तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या विकासाकडे नेहमीच खास लक्ष पुरवायचे. महाराष्ट्रात आज अनेक शिक्षणसंस्था आपण चालवीत असताना अप्पांनी घालून दिलेल्या उदाहरणाचे आपण सर्वांनी काटेकोर अनुकरण करण्याची नितांत गरज आहे.

डॉ. अशोक ढवळे
(ashokdhawale@yahoo.co.in)
पॉलिट ब्यूरो सदस्य, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *