बातमी

माजी नगराध्यक्ष पैलवान पांडूरंग भाट यांचे निधन

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील मंडलिक गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष, पैलवान पांडूरंग कृष्णा भाट (वय – ६७ ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक , खास. संजय मंडलिक गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पैलवान पांडूरंग भाट यांची तालुक्यात ओळख आहे. कुस्तीमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत धडक मारली होती.शालेय स्तरावर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. जयशिवराय तालीमचे त्यांनी वस्ताद अनेक वर्षे काम पाहिले आहे. अनेक राष्ट्रीय स्तरावरील मल्ल तयार केले आहेत. येथील नामवंत राणाप्रताप क्रीडा मंडळाचे ते आधारस्तंभ होते.

दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली मुरगूड नगरपरिषदेत १७ डिसेंबर १९९७ ते १६ डिसेंबर १९९८ या कालावधीत त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. सध्या ते येथील राजर्षी शाहु सहकारी पतसंस्थेत संचालक म्हणूनही काम पहात होते. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय सामाजिक व कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

अंत्यसंस्कारावेळी मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड वीरेंद्र मंडलिक, प्राचार्य डॉ अर्जून कुंभार , माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, कोजीमाशि पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रा. चंद्रकात जाधव, माजी नगरसेवक पैलवान जगन्नाथ पुजारी यांनी पांडूरंग भाट यांना आदरांजली वाहिली.

यावेळी बिद्रीचे माजी उपाध्यक्ष दत्तामामा खराडे, दलितमित्र प्रा. डी डी चौगले, माजी सरपंच देवानंद पाटील, बिद्री साखरचे माजी संचालक पंडितराव केणे ,बिद्री साखरचे माजी उपाध्यक्ष केशवकाका पाटील, माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, कोजिमाशीचे माजी चेअरमन एच आर पाटील , मंडलिक साखरचे माजी संचालक एन एस चौगले , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बीजी पाटील , माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, माजी संचालक नारायण मुसळे,माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर, उद्योगपती जोतीराम सुर्यवंशी, कार्यवाह आण्णासाहेब थोरवत, दलितमित्र एकनाथराव देशमुख यासह आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक व कुस्ती क्षेत्रातील लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

माजी नगराध्यक्ष भाट यांच्या निधनाबद्दल जय शिवराय एज्युकेशन संस्थेच्या येथील शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन, विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूल या शाळांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली . त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *