लेख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

राज्यातील अनुसुचित जाती / नवबौध्द प्रवर्गातील शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच ही योजना शंभर टक्के राज्य पुरस्कृत आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी अधिकारी मार्फत ही योजना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

योजनेची व्याप्ती : राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व 34 जिल्हयांमध्ये सदर योजना राबविण्यात येत आहे.

अनुसुचित जाती /नवबौध्द प्रवर्गातील शेतकरी यांना देण्यात येणारे अनुदान –

  1. नवीन विहीर – 25 हजार,
  2. जुनी विहीर दुरुस्ती – 50 हजार,
  3. इनवेल बोअरींग व पंप संच (डीझेल/विद्युत)- प्रत्येकी 20 हजार रुपये,
  4. वीज जोडणी आकार – 10 हजार,
  5. शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण – एक लाख रुपये,
  6. सुक्ष्म सिंचन संच – ठिबक सिंचन संच 50 हजार तर तुषार सिंचन संच – 25 हजार रुपये शासनाकडून अनुदान देण्यात येते.

या योजनेंतर्गत उपरोक्त बाबींचा समावेश असून लाभ पॅकेज स्वरुपात देण्यात येईल. खालील 3 पैकी कोणत्याही एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थीस देय आहे.

  1. नवीन विहीर पॅकेज – नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग.
  2. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज – जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग.
  3. शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज-शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व पंप संच.
    ज्या शेतक-यांनी यापुर्वीच योजनेतुन/स्वखर्चातून विहीर घेतली असेल त्यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच यासाठी अनुदान अनुज्ञेय आहे.
    वरील घटकांपैकी काही घटक शेतकरी यांचेकडे उपलब्ध असतील तर उर्वरीत आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व पंप संच या घटकांची निवड करावी.

लाभार्थी पात्रता-

  1. लाभार्थी अनुसुचित जाती / नवबौध्द प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  2. शेतकरी यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.15000/- पेक्षा जास्त नसावे.
  3. नवीन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकरी यांचेकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. तसेच यापुर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा.
  4. लाभार्थ्याच्या 7/12 वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास नवीन विहीर लाभ घेता येणार नाही.
  5. नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून 500 फुटाचे अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी.
  6. नवीन विहीर व्यतिरिक्त अन्य बाबींचा लाभ घेण्यासाठी किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

7/12, 8 अ, आधार कार्ड, तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला, नवीन विहीरीचे बाबतीत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला असणे आवश्यक आहे, जात प्रमाणपत्र.

अर्ज कोठे करावा –

अर्ज www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आनलाईन करावा. सदर सुविधा
साधारणपणे प्रत्येक वर्षी ऑगस्ट/सप्टेंबर मध्ये एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येते.

पुर्वसंमती व कार्यारंभ आदेश –

नवीन विहीरीसाठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर कृषि अधिकारी पंचायत समिती हे कार्यारंभ आदेश देतील. त्यानंतर 30 दिवसाचे आत काम सुरु करावे.

शेततळे अस्तरीकरण –

शेततळे अस्तरीकरणासाठी 500 मायक्रान जाडीची प्लास्टिक रिईनफोर्स्ड एचडीपीई जिओ
मेंबरेन फिल्म (IS:15351:2015 Type II) वापरावी.

ठिबक सिंचन संच – प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून 55 टक्के अनुदान व या योजनेतुन 35 टक्के (रु.50000/- मर्यादेत) अनुदान असे 90 टक्के अनुदान लाभार्थ्याला देय राहील.

तुषार सिंचन संच – प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून 55 टक्के अनुदान व या योजनेतुन 35टक्के (रु.25 हजार/- मर्यादेत) अनुदान असे 90 टक्के अनुदान लाभार्थ्याला देय राहील.

पंप संच – पुर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी एक महिन्याच्या आत पंप संच बाजारातील अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावा.

अनुदान – शासनाकडून देय अनुदान इलेक्ट्रानिक फंड ट्रान्सफरव्दारे लाभार्थींचे आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन या 100 टक्के राज्य पुरस्कृत योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबधित तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *