बातमी

शिवराजच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना तुळशी रोपांचे वाटप

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड येथील शिवराय विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगूड मधील राष्ट्रीय हरित सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तुळशी विवाह निमित्त तुळशी पूजनासाठी विद्यार्थ्यांना तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज चे उपमुख्याध्यापक आर. बी. शिंदे होते.

तुळस ही बहुगुणी वनस्पती असून आयुर्वेदामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या पुराणग्रंथांमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे एक औषधी वनस्पती म्हणून आपण तुळशीकडे जागरूकतेने पाहणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री. आर. बी. शिंदे यांनी केले.

हरितसेना समन्वयक शिक्षक वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनातून तुळशीचे औषधी गुणधर्म व पर्यावरणीय महत्त्व विशद केले. अविनाश चौगले यांनी तुळशी विवाह संबंधी ‘तुळशी विवाह – एक समीक्षा ‘ या पुस्तकाचे विद्यार्थ्यांनी वाचन करून तुळशी विवाहाचे वास्तव समजून घ्यावे व तुळशीचे पूजन करावे असे प्रतिपादन केले .

याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना १२० तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सौ. एस. जे. कांबळे, आर ए जालिमसर, पी.डी. रणदिवे, ए.पी. देवडकर, चंद्रकांत भोई आदींसह हरितसेनेचे विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक प्रविण सुर्यवंशी यांनी तर आभार एस एस सुतार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *