व्हनाळी (सागर लोहार) : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, भात, सोयाबीन या प्रमुख पिकांसह फळे व भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने बिद्री ( ता. कागल ) येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी गारगोटी – कोल्हापूर राज्यमार्ग अडवल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख विजय देवणे यावेळी म्हणाले, यंदा पडलेला परतीचा पाऊस हा ढगफुटी सारखा होता. या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी कंगाल झाला आहे. सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शिवसेना राज्यात बाहेर फिरु देणार नाही ; असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी आंदोलकांच्यावतीने मागणीचे निवेदन मुरगूड पोलिस ठाण्याचे पीएसआय राहुल वाघमारे यांना देण्यात आले. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख सुरेश चौगले, जिल्हा समन्वयक जयसिंग टिकले, उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, तालुका प्रमुख अविनाश शिंदे, अशोक पाटील, भिकाजी हळदकर, मारुती पुरीबुवा, उत्तम पाटील, दिग्वीजय पाटील, सागर भावके, महिला उपजिल्हाप्रमुख रंजना आंबेकर,अवधुत पाटील, सुरेश पाटील, नागेश आसबे, सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुरगूड पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.