बातमी लेख

पक्षाचा नव्हे मतदारांचा जाहिरनामा आवश्यक

ब्रिटीशांच्या विरोधामध्ये 100 वर्षे लढा भारतीयांनी केला. अनेक मार्गांनी तो चालला. आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांनी त्यामध्ये भाग घेतला. अनेक राजकीय पक्षांनी या लढ्यामध्ये भाग घेतला. अनेक क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने सत्तेवर आलेल्या पक्षांनी प्रयत्न केला. स्वातंत्र्याची लढाई करताना देशातील पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियासुद्धा आघाडीवर होत्या. सर्व जाती धर्माच्या लोकांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता.

लोकशाही व्यवस्था देशाने स्विकारल्यामुळे देशाची प्रगती व भरभराटी होईल असे वाटत होते. परंतू दहशतवाद, आर्थिक विषमता, काळ्या पैशाची मक्तेदारी यामुळे देशाची प्रगती मनासारखी झाली नाही. लोकशाहीचा खरा आधार एकच असताना त्यांची म्हणावी तशी प्रगती झाली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला देश मागे पडला. भ्रष्टाचाराने देश पोखरला गेला. ज्यांनी देश चालवायचा तेच लोक देशाला ओरबडून खाऊ लागले. देशाची नैसर्गिक संपत्ती फुकटामध्ये मिळवून त्यावर कोट्यावधी रूपये सत्ताधार्‍यांनी कमावले. देशाला कंगाल करून हे लोक श्रीमंत झाले.

आज जनतेचा राज्यकर्त्यांच्या वरील विश्वास उडाला आहे. सध्या लोकशाही पद्धतीने संसदेची निवडणूक लागली आहे. अनेक पक्ष आज आपल्या पक्षाच्या घोषणा करताना दिसतात. गेल्या 15 वर्षामध्ये अशाच घोषणा झाल्या पण त्याची प्रामाणिकपणे अम्मलबजावणी झालेली दिसली नाही. राज्यकर्त्यांच्यामध्ये तसेच सर्वच पक्षाच्या लोकांचेवर जनतेचा विश्वास राहिलेला दिसत नाही. म्हणून आता मतदारांचाच जाहिरनामा असावा अशी अपेक्षा त्यावेळी निवडणूक लढविणार्‍या पक्षांना व उमेदवारांना मतदारांची नेमकी बांधिलकी कोणती असावी हा आदेश देता येईल असे वाटते.

मतदारांचा जाहिरनामा

1) अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे प्रत्येक भारतीयाचे मूलभूत हक्क आहेत ते मिळाले पाहिजेत.

2) समाजातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळाले पाहिजे.

3) 18 ते 55 वयाच्या सर्व स्त्री पुरूषांना अंगभर काम मिळाले पाहिजे.

4) राष्ट्रातील नैसर्गिक संपत्ती म्हणजेच झाडे, पाणी, खनिज, सौरऊर्जा यांचे संरक्षण करून त्याचा काटकसरीने वापर करून राष्ट्रीय उत्पन्न वाढवावे.

5) श्रमाशिवाय मिळविलेली संपत्ती गुन्हा ठरवून ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून जमा करावी.

6) देशाची संपत्ती वाढविण्याचे अनेक मार्ग स्विकारावेत या संपत्ती देशाची मालकी असावी.

7) परदेशामध्ये असलेला काळा पैसा भारतात आणावा. काळा पैसा बाळगणार्‍यांना गुन्हेगार ठरवून कठोर शिक्षा करावी.

8) देशाच्या सर्व पातळीवरील भ्रष्टाचार निपटून काढावा.

9) निवडून येणार्‍या किंवा निवडणूकीत उभे रहाणार्‍या उमेदवारांनी आपली संपत्ती जाहिर करावी. प्रत्येक वर्षी आपली व आपल्या कुटूंबाची संपत्ती जाहिर करावी.

10) विकासाच्या कामामध्ये पारदर्शकता ठेवून अवास्तव खर्चावर नियंत्रण ठेवावे.

11) धर्म, जात, पंथ, प्रदेश, भाषा याचा दुराभिमान बाळगून द्वेषाने व फुटीने राजकारण करणार्‍यांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यास मनाई करावी.

12) लोकसंख्या नियंत्रण, स्त्री-पुरूष समानता, धर्म निरपेक्षता ही राष्ट्रीय कर्तव्य समजून त्याच्या अम्मलबजावणीत आड येणार्‍यांना प्रतिबंध करावा.

13) देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकविण्यासाठी व त्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करणे.

14) लोकपाल विधेयकासारखी विधेयके मंजूर करून सर्व स्तरातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे.

या सर्व कलमातून आपल्याला बलशाली भारत निर्माण करता येईल. त्यासाठी लढून मिळविलेला मताचा अधिकार जपून वापरावा. मतदारांची सत्ता आमदार, खासदारांनी आमच्यासाठीच राबवावी. म्हणून आपले मत म्हणजे लोकप्रतिनिधिंना आदेश आहे. असा मतदारांच्या जाहिरनाम्यातून संदेश जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *