बातमी

कोल्हापूर – गगनबावडा मार्गावर अवजड वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश निर्गमित

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : कोल्हापूर ते गगनबावडा मार्गवरुन होणारी अवजड वाहतूक प्रतिबंधित करण्यासाठी मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक सायंकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत पूर्णतः बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्यास व सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवा व प्रवासी वाहतुक सुरु ठेवण्यास व जड वाहतुकीस सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत महामार्ग संपूर्ण बंद ठेवणे व पर्यायी मार्गाने वळविण्यास तसेच दिनांक 1 फेब्रुवारी ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद करुन अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतुक सुरक्षा उपायोजनेद्वारे वाहतुक नियंत्रीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्गमीत केले आहेत.

कोल्हापूर -गगनबावडा-करुळ घाट हा रस्ता करुळ घाट मार्ग कोकणकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरुन कोल्हापूर ते कोकण जाणारी वाहतुक मोठ्या प्रमाणावर असून रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणात खासगी प्रवासी बसेस या रोडवरुन गोव्याकडे जात असतात. या वाहतुकीबरोबरच इतर प्रवासी व माल वाहतुक देखील मोठ्या प्रमाणात आहे.

          या वाहतुकीसाठी कोल्हापूर- गगनबावडा-करुळ घाट हा कामकाजाच्या निमित्ताने बंद राहणार असल्याने कोल्हापूर – गगनबावडा मार्गावरील वाहतुक प्रामुख्याने पर्यायी रस्ता म्हणुन कोल्हापूर -दाजीपूर मार्गे कोकण – गोवा तसेच कोल्हापूर – कळे – बाजार भोगांव – पाचलमार्ग – लांजा राजापूर अशा मार्गाने कोकणकडे जाण्यास पर्यायी मार्ग आहेत. तसेच करुळ घाटातून होणाऱ्या वाहतुकीसाठी कोल्हापूर – भोगावती -गैबी राधानगरी फोंडा तसेच निपाणी मुदाळतिटटा – गैबी – राधानगरी फोंडा असा पर्यायी मार्ग आहे.

राधानगरी ते फोंडा जाणारा रोड घनदाट जंगलातून असून अरुंद व धोकादायक वळणाचा घाट आहे. वरील प्रमाणे असलेल्या पर्यायी मार्गाने वाहतुक वळवायची झाल्यास खालील मोठ्या आकाराच दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे, तसेच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडून मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यात यावे, तसेच

1. कोल्हापूर शहरामध्ये रंकाळा टॉवर या ठिकाणी येऊन ती वाहतुक क्रशर चौक-इराणी खण मार्गे राधानगरी रोडकडे जाते या ठिकाणी दिशादर्शक चिन्हांसह कोल्हापूर गगनबावडा रस्ता किती तारखेपासुन किती तारखेपर्यत बंद राहणार आहे याबाबत सविस्तर माहितीचा फलक लावणे गरजेचे आहे.

2. कोल्हापूर गगनबावडा रोडवर फुलेवाडी, रिंगरोड, जकातनाका येथे मोठ्या आकाराचा फलक लावण्यात यावा जेणेकरुन सदरची वाहतुक रिंगरोडमार्गे आपटेनगर, पूईखडीमार्गे राधानगरीकडे मार्गस्थ होईल.

3. गैबी ता. राधानगरी या ठिकाणी कोल्हापूर-भोगावती – गैबी व मुदाळतिटटा सोळांकूर गैबी असे दोन रस्ते येऊन मिळत असल्याने या ठिकाणी प्रत्येक वळणावर दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे.

4. कोल्हापूर भोगावती मार्गावरील खिंडी व्हरवडे ते गैबी हा घाट धोकादायक वळणाचा असून या ठिकाणी वळणावरती कोठेही दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर लावलेले नाहीत. या ठिकाणी प्रत्येक वळणावर दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे.

5. दाजीपूर ते फोंड़ा जाणारा रोड दाजीपूर अभयारण्य क्षेत्रातुन जात असुन रोडवर जंगली प्राणी येण्याची शक्यता आहे. तसेच हा घाट हा धोकादायक व अरुंद आहे. रात्रीच्या वेळी धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राधानगरी फोंडा रोडवर प्रत्येक वळणावर मोठ्या अक्षरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे.

6. राधानगरी ते फोंडा जाणारा रोड दाजीपूर अभयारण्य क्षेत्रातुन जातो. रोडच्या कडेला पूर्णत: साईड पट्टया नाहीत तसेच रोडच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या रोडवर आल्याने मोठ्या वाहनांना फांद्या लागून अपघात होण्याची शक्यता असल्याने रोडवर आलेल्या झाडांच्या फांद्या काही प्रमाणात तोडणं गरजेचं आहे, त्यासाठी वनविभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे.

7. गगनबावडा पोलीस ठाणे हद्दितील डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना मर्यादीत असळज या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सध्या सुरु असुन या कारखान्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काही प्रमाणात ऊस पुरवठा होतो, ही ऊस वाहतुक करुळ घाट मार्गाने होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणारी ऊस वाहतुक संबंधित कारखान्याकडून पूर्ण झाल्यानंतरच हा मार्ग बंद करणे योग्य ठरेल.

8. करुळ घाट बंद केल्यास जे पर्यायी मार्ग सुचविलेले आहेत त्यामध्ये तळेरे-भुईबावडा-गगनबावडा-कळे-कोल्हापूर असा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुचविण्यात आला आहे. परंतु हा घाट अत्यंत अरुंद, तीव्र उतार व वळणाचा आहे. तसेच या घाटात कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक किंवा वाहतूक नियमनासंदर्भात फलक नाहीत. हे सर्व फलक लावणे आवश्यक आहे. तसेच घाटात रोडलगत संरक्षण कठडा नाही, त्याबाबतीत उपाययोजना करणे आवश्यक आहे. या मार्गाने फक्त हलक्या प्रवासी वाहनांनाच परवानगी असावी अन्यथा अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

9. पर्यायी मार्गावर लावण्यात येणाऱ्या सर्व फलकांच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी फलक वाहनधारकांना दिसावा याकरीता रेडियम लावणे गरजेचे आहे.

10. पर्यायी मार्गावर लावण्यात येणारे सर्व फलक मोठ्या आकाराचे व वाहनधारकांना दिसतील अशा प्रकारे लावणे गरजेचे आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *