बातमी

मुरगूड मध्ये रस्ता बचाव कृती समितीचा बंद व निषेध फेरी

आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या;


अपघाती मृत्यूस जबाबदार धरून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


मुरगूड ( शशी दरेकर ) :
मुरगूड ता कागल येथे लिंगनूर मुदाळतिट्टा रस्त्यासाठी झालेल्या रास्तारोको आंदोलनावेळी शासकीय अधिकाऱ्यास मारहाण केल्याबद्दल पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीसांनी आंदोलन दडपण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता.२४) मुरगूडमध्ये सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीच्या वतीने मुरगूड बंद व निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी आंदोलकांनी मुरगूड पोलीस ठाण्यात जाऊन सामाजिक प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरील खोट्या केसेस मागे घ्याव्यात,खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघाती मृत्यूसाठी जबाबदार असणारे संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

गेल्या चार वर्षांपासून उध्वस्थ अवस्थेत असणारा व अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेणाऱ्या लिंगनूर ते मुधाळ तिट्टा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी सर्व पक्षीय रस्ता बचाव कृती समितीने बुधवारी ( ता. २०) मुरगूड येथे सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन केले होते.

मुरगूड बंद व निषेध फेरीस नागरिकांनी सक्रिय पाठिंबा दिला.मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सकाळी साडे आठ पासून नागरिक मुरगूड बस स्थानक परिसरात जमू लागले.आंदोलकांचा मोठा जमाव बस स्थानक परिसरातून नवमहाराष्ट्र चौक, राणाप्रताप चौक मार्गावरून निपाणी देवगड राज्य मार्गावर जुना नाका क्र एक येथे पोहोचला. रस्त्यावर जागोजागी व्यापारी छोटे विक्रेते उत्स्फूर्त पणे फेरीत सहभागी झाले.त्यामुळे शेकडो नागरिक आंदोलनात सहभागी झाले. नागरिकांनी नाका क्रमांक 1 पासून पुन्हा निषेध फेरी सुरू केली व त्याच मार्गावरून आंदोलक
मुरगूड पोलीस स्टेशन समोर जमा झाले.
या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरगूड शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी,जयसिंग भोसले,प्रदीप वर्णे,नामदेवराव मेंडके,संतोष वंडकर,भगवान लोकरे,डी.डी.चौगले, दिग्विजय पाटील,शिवाजी चौगले,सुशांत कलकूटकी,अक्षय सूर्यवंशी,किरण गवाणकर,राजेंद्र भाट,दिगंबर परीट,संजय मोरबाळे, बजरंग सोनूले,दीपक शिंदे,गणपतराव मांगोरे,मारुती कांबळे,अनिल राऊत आणि शेकडो आंदोलकांच्या उपस्थितीत मुरगूड पोलिसांना निवेदन दिले.

परस्पर विरोधी गुन्हे दाखल बुधवारी 20 तारखेच्या निपाणी फोंडा राज्य मार्गावर धरणे आंदोलन सुरू होते त्या दरम्यान
सार्वजनिक बांधकाम उपविभाग,राधानगरीचे सहायक अभियंता अमित किरण पाटील यांनी आपल्याला पांडुरंग भाट,रवि परीट,दत्ता मंडलीक,व बजरंग पाटील (सर्व रा.मुरगूड ) यांनी शिवीगाळ करत ‘तुला काय अधिकार आहे, तु इकडे का आला आहेस,’ असे म्हणत मारहाण केली.व आपला शर्ट फाडला अशी तक्रार मुरगूड पोलीसांत दिली आहे.

सर्व पक्षीय आंदोलक व नागरिकांनी लिंगनूर मुधाळ तिट्टा ते राधानगरी सोळांकुर पर्यंत रस्त्यावर झालेल्या अपघाती मृत्यू व जखमी जायबंदी लोकांच्या दुःख त्रासास सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अधिकारी दोषी आहेत.खाजगी ठेकेदार कंपनीच्या रस्ता बांधकामावर लक्ष ठेवून ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित शासकीय खात्याची आहे.खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघातात दगावलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारण ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *