मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल गाव भागातील रावण गल्लीमध्ये रहात असलेल्या पांडुरंग गणपती डेळेकर यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडी कोंयडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख किंमतीचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागीने लंपास केले . या घटनेची मुरगूड पोलिसात नोंद झाली आहे.
या घटने संबधी अधिक माहिती अशी : पांडुरंग डेळेकर हे आपल्या पत्नीसह रविवारी नातेवाईकांकडे कोल्हापूरला गेले होते. दरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास बंद दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला.
तेथून त्यांनी दुसऱ्या मजल्यावरीलं बेडरुममधील लोखंडी तिजोरीच्या दरवाजा उचकटून लॉक तोडून काढले व आतील ड्रॉवरमध्ये असणारे दोन तोळ्याचे गंठन, अडीच तोळ्याची कर्णफुले व लप्पा तसेच अर्धा तोळ्याची पिळाची अंगठी असा तीन लाखाचा ऐवज घेवून चोरट्यांनी दरवाजा पुन्हा बंद करुन पलायन केले. आज सकाळी शेजारी रहात असलेल्या शिवाजीराव सातवेकर यांच्या निर्दशनास हा प्रकार येताच त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दिली व माहिती घेतली.
या घटनेची मुरगूड पोलीसात नोंद झाली आहे. पोलीसांनी श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण श्वान गाव तलावापर्यंत येवून घुटमळत राहिले. ठसे तज्ञांनी घटनास्थळावर येवून तपासासाठी ठसे घेतले. दरम्यान करवीर विभागाचे पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांनीही घटनास्थळावर जावून या घरफोडीची माहिती घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर व पोलीस उपनिरी क्षक राहूल वाघमारे करीत आहेत .