बातमी

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी प्रेरित व्हा- पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. 12 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी प्रेरित व्हावे, हेच त्यांच्याविषयीच्या चित्ररथाचे खरे प्रयोजन आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व सहाय्यता मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. आज या चित्ररथाचे स्वागत छत्रपती शिवाजी चौक, कागल येथे मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी ते बोलत होते.

श्री. मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा, कला, संस्कृती आदी सर्वच क्षेत्रात उत्तुंग कार्याचा डोंगर उभा केला आहे. कोल्हापूरचे ते खरे भाग्यविधाते आहेत. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात नावाजले जाते. या चित्ररथावर त्यांच्या कार्याची काही क्षणचित्रे पाहावयास मिळतात. पण, त्याही पलिकडे त्यांचे कार्य आहे. ते या निमित्ताने नागरिकांनी  जाणून घेणे अभिप्रेत आहे, असेही ते म्हणाले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरील चित्ररथाचे छत्रपती शिवाजी चौक प्रांगणात आगमन होताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी रथावरील भव्य शाहूप्रतिमेच्या पायी पुष्प वाहून स्वागत केले. यावेळी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अजय पाटणकर व कागल नगरपरिषदेचे इतर अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *