मडीलगे ( जोतिराम पोवार ) : आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामांच्या बकऱ्यांचे पूजन, लेंढीपूजन व बकरी बुजवण्याचा कार्यक्रम धार्मिIक वातावरणात मोजक्याच मानकर्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. येथील मरगुबाई मंदिर परिसरातील भव्य पटांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रतिवर्षी दीपावली पाडव्यादिवशी मामांच्या बकऱ्यांचे पूजन व बुजवणे असा कार्यक्रम करण्यात येतो. यावर्षी कोरोनामुळे प्रशासनाने मोजक्याच मानकर्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करावा असा आदेश दिल्याने त्याला प्रतिसाद देत बाळूमामा देवालय समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला.

या उत्सवामध्ये मामांच्या बकऱ्यांना फुलाच्या माळांनी सजवले होते. त्यांची पूजा करून त्यांना बुजवणे (पळविण्यात) आले. प्रसंगी बकऱ्यांच्या लेंड्या एकत्र करून त्याची रास केली होती. राशीभोवती सुबक रांगोळी, फुलांच्या माळांनी सजावट केली होती. यावेळी बाळूमामा देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते भंडारा आणून भंडारा राशीवर उधळण्यात आला. बाळूमामांच्या नावानं चांगभलं चा जयघोष यावेळी उपस्थित मानकरी वर्गाने केला. त्यानंतर दूध उतू जाण्याचा कार्यक्रम झाला. यावर्षी उत्तर दिशेला दूध उतू गेल्याने ती दिशा सुजलाम-सुफलाम होईल असा संकेत मानला जातो.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील,केदार जठार-नाईक (वाघापूर),सुभाष पाटील ,चंद्रकांत पाटील, एस. पी. पाटील, संभाजी पाटील,
एस .के.पाटील, विठ्ठल पाटील ,डॉ.संताजी भोसले ,दत्तात्रय पाटील, दिलीप पाटील, महादेव पाटील, विठ्ठल पुजारी,मुरारी पुजारी, आदी मान्यवर उपस्थित होते.