बातमी

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन व अशासकीय संस्थांनी एकत्र यावे – डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये (सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

चांगुलपणाची चळवळ परिवारासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात विचारमंथन बैठक

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) :  शासन-प्रशासन, सुज्ञ नागरिक, उद्योजक, शेतकरी तसेच सामाजिक संस्था यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यायला हवे. सामाजिक कार्यात प्रशासनाची भूमिका महत्वाची असून त्यांच्या सहकार्याने सामाजिक संस्था प्रत्येक क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून काम करतील असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी केले. ते चांगुलपणाची चळवळ परिवाराच्या विचारमंथन कार्यक्रमाची जिल्हाधिकारी कार्यालयात सांगता झाली त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 250 हून अधिक अशासकीय संस्थांनी एकत्रित येवून चांगुलपणाची चळवळ उभारुन समाजातील अनेक विषय व सामाजिक कामांवर विचारमंथन करण्यासाठी जिल्ह्यात कार्यशाळांचे आयोजन केले होते. याचा समारोप कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली व अशासकीय संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.मुळ्ये पुढे म्हणाले, समाजात अनेक प्रकारच्या सामाजिक संस्था वेगवेगळ्या विषयांवर काम करीत आहेत. समता, स्वातंत्र्य व न्याय यावर निष्ठा ठेवून देहदान, रक्तदान, अन्नदान, वृद्धाश्रम, स्वच्छता, आरोग्य, दिव्यांग, महिला व बाल कल्याण अशा अनेक विषयांवर काम करीत आहेत. समाजातील चांगल्या कामासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. प्रशासनाला सहकार्य करीत एकत्र येवून सामाजिक कार्य आपल्या हातून घडावे. शासनाकडून काय अपेक्षा आहेत यावर चर्चा व्हावी असेही ते यावेळी म्हणाले. तसेच या कार्यक्रमात प्रशासन व चांगुलपणाची चळवळ परिवार एकत्र येवून काम करेल असेही ठरले. यानंतर भविष्यात यातून अनेक प्रकारची सामाजिक कामे हाती घेण्यात येणार आहेत.

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन व अशासकीय संस्थांनी एकत्र यावे – डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये

 यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, शासनाकडून समाजातील गरजूंसाठी अनेक कार्यक्रम चालविले जातात. यावेळी कुठे ना कुठे सामाजिक संस्थांचा संबंध येतोच. प्रशासनामार्फत योजना राबवित असताना निश्चितच सामाजिक संस्थांनी मांडलेले विचार व मुद्दे प्रशासन लक्षात घेईल व आवश्यक सहकार्य करेल. यावेळी विनायक माळी, ॲड.संतोष पवार, डॉ.प्रिती काळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *