कागल : येथील राष्ट्रीय महामार्गावर श्री शाहू हायस्कूल समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटार कारने पादचारी युवतीस जोराने ठोकरले. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तथापि उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला.
ज्योती अक्षय समुद्रे (वय २०) रा. पिंपळगाव खुर्द ता. कागल असे दुर्दैवी युवतीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. मोटार कारचालक पार्थ प्रकाश मोरे रा. गडहिंग्लज यास पोलिसांनी अटक केली आहे.
अपघातानंतर मोटारकार चालक फरार झाला होता. पो.नि. ईश्वरा ओमासे यांनी तातडीने हालचाली करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावरून निक्साॅन कंपनीची मोटारकार असून प्रकाश मोरे रा. गडहिंग्लज यांच्या ती मालकीची आहे. त्यांचा मुलगा पार्थ मोरे हा गाडी चालवत होता. आईसह तो कोल्हापूरकडे निघाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
ज्योती आपल्या घरातून सकाळी साडेसात वाजता कागल येथील टायपिंग क्लासला जात होती. सकाळी आठ वाजता ती श्री शाहू हायस्कूल समोरील राष्ट्रीय महामार्गावर आली. ज्योती कोल्हापूरच्या दिशेने पायी रस्त्याच्या डाव्या बाजूने जात असता पाठीमागून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारकारने तिला जोरात ठोकरले. जबर धक्क्याने उडून जमिनीवर आपटली. डोक्याला मार लागल्याने रस्त्यावर मोठा रक्तस्त्राव झाला होता. रुग्णवाहिकेतून तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तथापि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
ज्योती समुद्रे हिचा विवाह पाडळी येथील अक्षय समुद्रे यांच्याशी दीड वर्षांपूर्वी झाला होता. मात्र गेल्या चार महिन्यापूर्वी पती अक्षयचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्याचा ज्योतीवर मोठा आघात झाला होता.त्यामुळे तिच्या आईने पिंपळगाव खुर्द येथे तिला माहेरी आणले होते.
घरच्या मंडळींनी तिला मोठा आधार देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कागल येथील टायपिंग क्लासला घातले होते. परंतु दुर्दैवाने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अपघातात तिचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद संदीप अशोक कांबळे रा. पिंपळगाव खुर्द यांनी कागल पोलिसात दिली. अधिक तपास उपनिरीक्षक रविकांत गच्चे करीत आहेत.