महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर राज्याचा विकासाला चालना देण्याचे काम चालु झाले. ज्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात स्व. यशवंतरावजी चव्हाणांच्या भूमिकेला विरोध होता तेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. ते काँग्रेसनिष्ठ होतेच पण ते काँग्रेसपेक्षा जास्त नेहरुनिष्ठ होते असे लोकांना वाटत होते. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत यशवंतरावाना काळे झेंडे दाखविले तेच लोक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांची नंतर स्तूती करु लागले. यशवंतरावानी मुत्सदीपणाने व शांत डोक्याने लोकांना शांत केले. चव्हाण बहुजन समाजाचे नेते वाटत होते. यशवंतरावांच्या शिवाय काँग्रेसचे पानही हालत नव्हते.
यशवंतरावांच्याबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. यशवंतरावांची काम करण्याची शैली, क्षमता व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा स्वभाव पाहिल्यास कृषी औद्योगिक क्रांती निश्चित करतील अशी सबंध महाराष्ट्र राज्याची अपेक्षा होती. स्वातंत्र्य चळवळीत काम करताना यशवंतरावानी आपले संघटन कौशल्य दाखविले होते. राज्याचा बराचसा भाग दुष्काळी होता. लोकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. पाण्याअभावी पीके निघत नसल्याने महाराष्ट्रातला शेतकरी खाजगी सावकारीत अडकला होता.
दुष्काळी भाग पाण्याखाली ते आणतील असे सर्वांना वाटत होते. यशवंतराव चव्हाणांच्या काळात साखर कारखानदारी आणि उद्योगांना मोठी चालना मिळाली. पश्चिम महाराष्ट्राने साखर कारखानदारीमध्ये आघाडी घेतली. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी शेतकर्यांच्या कडून शेअर्स जमा करुन अनेक साखर कारखाने मंजुर करुन आणले. काँग्रेसच्या या नेत्यांना स्वातंत्र्यचळवळीची पार्श्वभूमी होती. सर्व नेते राष्ट्रप्रेमी, चारित्र्य संपन्न व शेतकर्यांच्याबद्दल कळवळा असणारे होते. सहकाराची ही चळवळ शासन, सभासद व व्यवस्थापन या तीन खांबावर उभी राहिल्याने या सहकारी संस्था सभासदांना आपल्या वाटू लागल्या. काही तालुक्यामध्ये तर अंतर्गत गटबाजीतून दोन दोन साखर कारखाने निघाले.
यशवंतरावजींच्या काळात सहकाराचा मोठा प्रचार झाला. गांवागावातील कार्यकर्त्यांनी सहकारी सोसायटीच्या, दुधसंस्था, पाणी पुरवठा संस्था, ग्राहक संस्था अशा अनेक लोकोपयोगी संस्थांचे जाळेच निर्माण केले. सहकारामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्ते सक्षम झाले. त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पर्यायाने ग्रामीण भागामध्ये काँग्रेस पक्ष बळकट झाला. काही नेत्यांनी साखर कारखान्याबरोबर सुतगिरण्या, शाळा, महाविद्यालये, दुधसंघ, प्रक्रिया संघ, कागद कारखाने, तंत्र कॉलेज, पशु खाद्य, कारखाने, डिस्टलरी, वीज निर्मिती संस्था काढल्याने अनेक बेरोजगार तरुणाना आपल्याच भागामध्ये गावाजवळच नोकर्या मिळाल्या. शेतीसाठी खते, औषधे, बी बियाणे, शेतीउपयोगी साहित्य, गांवाजवळच मिळू लागले. शेतकर्यांचे हाल कमी झाल्याने त्यांना शेतीत काम करण्यास उत्साह निर्माण झाला. शेतकर्यांचे ऊस पीकामध्ये उत्पन्न वाढल्याने बाजार पेठेला चांगले दिवस आले. कारखान्यांच्या परिसरातील व्यापारीही खुष झाले.
सहकर तत्व
शेतीला पूरक दुध व्यवसाय झाल्याने पशुपालन सर्वत्र जोरात सुरु झाला. दुध संघामध्ये परिसरातले दूध एकत्र करुन ते मुंबई, पुणे, कोकण, विभागांत पाठविण्यात येऊ लागले. त्यामुळे टँकर, टेंपो यांसारख्या वाहनांना काम मिळू लागले. त्यामूळे दुध व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळू लागला. सावकार शाहीतून मुक्त होण्यासाठी सहकारी संस्थांची निर्मिती झाली. सावकारशाही मोडीत निघाली. बँकाही शेतकर्यांना हमखास पिकाची शास्वती असलेने कमी व्याजात कर्ज देवू लागल्या. सहकर तत्वातून सहकारी संस्था काढून सावकार शाहीला टोला देणे हे सुरवातीच्या नेत्यांच्या मनात होते ते यशस्वी झाले.
सध्या सहकाराची तिसरी पीढी सहकाराचा उपभोग घेत आहे. या पीढीला काही त्रास न होता वंशपरंपरेने सत्ता मिळाली आहे. सध्या आयत्या ताटावर ताव मारण्याचे काम जोरात चालू आहे. ज्यांनी त्याग केला त्यांचाच घरातील नातेवाईक भ्रष्टमार्गाने सत्ता हातात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तिसर्या पिढीमध्ये सतशिल आणि चारित्र्यसंपन्न कार्यकर्ते दिसत नाहीत. गावपातळीवर अनेक संस्थातून संचालक आणि सचिव संगनमताने भ्रष्टाचार करीत आहेत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे संस्थांचे सभासद अस्वस्थ आहेत. त्यांच्या मनामध्ये संस्था चालकांच्या विरोधात मोठी खदखद आहे. थोडेच लोक भ्रष्टाचार करतात पण संपूर्ण सहकार ते बदनाम करीत आहेत. सहकारामध्ये अनेक दोष निर्माण झाले आहेत. शासनही सहकार कायद्याची चांगली अम्मलबजावणी करीत नाही.
अधिकारी भ्रष्ट
कायदा मोडणार्याना चांगले शासन झाले पाहिजे पण अनेक अधिकारी भ्रष्ट असलेने कायदा मोडणारे बोकाळले आहेत. सहकाराने दुर्बल माणसाला सबल केले असले तरी संस्थांच अडचणीत आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच सहकारात मक्तेदारी निर्माण झाल्याने एकच व्यक्ती अनेक ठिकाणी चेअरमन झालेली दिसते. सहकारामध्ये मस्तवाळपणाची भावना निर्माण झाली आहे. संस्था आपल्याच ताब्यात घेण्याचे उद्देश असल्याने गावांत गटबाजी निर्माण झाली. गावामध्ये एकमेकांबद्दल वैरत्वाची भावना निर्माण झालेली दिसते. काही संस्था नेत्यांच्या नावांवर काढल्या जातात. शासनाकडून लवकर मान्यता मिळावी यासाठी नेत्यांचे नाव देवून मखलाशी केली जाते.
संस्था बंद पडली की विनाकारण त्या नेत्यांची बदनामी होते. सहकारामध्ये विभूतीपूजा असता कामा नये. आज सहकाराला शासनाने सांभाळून घेण्याची आवश्यकता आहे. चांगल्या प्रामाणिक अधिकार्यांच्या नेमणूका करुन संस्था निकोप कशा चालतील हे पाहिले पाहिजे. पहिल्या पीढीने क्षमतेने चालविलेल्या सहकारी संस्था सावरण्यासाठी सहकारावर निष्ठा असणार्या कार्यकर्त्यांची गरज आहे. घराणेशाहीला मुठमाती देऊन सक्षम व प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देवून सहकार वाचविला पाहिजे. सहकारामध्ये राजकीय हस्तक्षेप कमी करुन निस्वार्थीपणाने संस्था चालविल्यास सहकार निश्चितच वाचणार आहे.