ताज्या घडामोडी

हायवे पोलिसांच्या त्रासातून वाहनधारकांची मुक्तता करा….!

कागल / प्रतिनिधी :
कागल शहरा लगत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी आहे. वळणदार रस्ता आणि चढ आहे. याचा फायदा घेत, हायवे पोलीस वाहनधारकांना बरोबर बकरा करतात. वाहनांच्या अडवणुकीमुळे अनेक वेळा या ठिकाणी दुचाकी स्वारांचे अपघात झालेले आहेत. वाहनधारकांची होणारी अडवणूक व पिळवणूक थांबविण्यात यावी, अशी मागणी कागल तालुक्यातील विविध पक्षांचे अध्यक्षस्थानी कागलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेले कित्येक वर्षे चाललेली ही अडवणुक व लुबाडणूक थांबवावी अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी येथे हायवेवर, हायवे पोलीस दहा ते बारा जण एकत्र येऊन रस्त्याच्या मधोमध उभे राहून गाड्या आडवितात. या ठिकाणी लांब पल्याचा वळणदार चढ आहे.यामुळे वाहनांची गती कमी होतअसते. याचा फायदा हायवे पोलीसांनी पध्दतशीरपणे उठविला आहे. कर्नाटकातून येणाऱ्या लोड च्या गाड्यांना नाहकपणे त्रासास सामोरे जावे लागत आहे.परिणामी अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेषता कर्नाटक मधून येणाऱ्या वाहनांना जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते. विनाकारण कागदपत्रांची तपासणी केल्याचा बहाना केला जातो.आणी कोणतेही कारण काढून आर्थिक लुबाडणूक केली जाते.

महाराष्ट्रातील सीमा बांधव जेव्हा कर्नाटक मध्ये निपाणी, बेळगाव ,संकेश्वर येथे जातात त्यावेळी त्यांना देखील महाराष्ट्रातील हायवे पोलिसांच्या कारवाईचै उ्ठठे, कर्नाटक पोलीस काढतात. त्यामुळे सीमा भागातील लोकांना दोन्ही राज्यांच्या सीमेवर प्रवास करताना नाहक त्रासास सामोरे जावे लागते .

काही दिवसापूर्वी समृद्धी महामार्गावर पोलिसांनी अचानक अडवलेल्या गाडीला पाठीमागून येऊन ज्या गाडीने धडक दिली त्या अपघातामध्ये 13 जणांचा नाहक बळी गेला. अशा घटना कागल मध्ये सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता कागलचे तहसीलदार यांनी या मध्ये लक्ष घालावे .व परिवहन विभागास तात्काळ सूचना करून हायवे पोलिसांच्या होणाऱ्या त्रासापासून प्रवाशांची मुक्तता करावी. अशा आशयाचे निवेदन कागल तहसीलदार यांना कागल मधील सर्वपक्षीय अध्यक्षांनी नुकतेच दिले आहे.

निवेदनावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल शहर अध्यक्ष संजय चितारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट कागल तालुका अध्यक्ष शिवानंद माळी , शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे , राष्ट्रीय काँग्रेस कागल तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे .यांच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.तहसीलदार कागल यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे. सदरच्या जनहितार्थ मागणीची दखल प्रशासनाने तात्काळ न घेतल्यास पुढील दिशा ठरवण्यात येईल व तीव्र आंदोलन छेडण्याचा येइल इशारा सर्व पक्षीय अध्यक्षांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *