gandhiji
संपादकीय

गांधीजी मारूनही मरत नाहीत हे प्रतिगाम्यांचे दुखणे

30 जानेवारी 2023 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खुनाला 75 वर्षे पूर्ण होतात. इतकी वर्ष होऊनही गांधीजींच्या खुनाला जबाबदार असणारी गोडसेवादी हिंसक प्रवृत्ती आपण गांधींना मारून चूक केली हे कबूल करीत नाहीत. उलट महात्मा गांधीजींची टवाळी करणे, गांधीजींना दोष देणे, प्रसारमाध्यमातून गांधीजींची बदनामी करणे कमी झालेले नाही. गांधीजींच्या खुनाचे समर्थन करून आपण किती निर्लज्ज आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘मी नथुराम बोलतोय’ सारखे नाटक सादर करून आपली समाजविरोधी भूमिका दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. गांधी फाळणीला जबाबदार आहेत, गांधींनी पाकिस्तानला 55 कोटी द्यावयास भाग पाडले असे खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा उद्योग चालू आहे.

खरे तर गांधीजींची लोकप्रियता गोडसे प्रवृत्तीला सहन होताना दिसत नाही. गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. 40 कोटी भारतीयांवर गांधीजींच्या नेतृत्वाचा मोठा प्रभाव होता हे या गोडसेवाद्यांना सहन होत नव्हते. त्यामुळे सतत गांधीजींना टार्गेट करण्यात आले. जनतेच्या हृदयात खोलवर गांधीजींचे स्थान आहे हे त्यांना डाचत होते. गांधीजींच्यावरील सतत टीका त्यांना अंगलट आली. गांधी द्वेष करीत असल्याने देशातील जनतेने अनेक वर्ष गोडसेवाद्यांना सत्तेत येऊ दिले नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देश काँग्रेस पक्षाच्या हातात राहिला. गांधी-नेहरूंच्या देशात गांधीजींचा खून करणार्‍या नथुराम गोडसे याला देशभक्त समजणारी प्रवृत्ती आजही असावी हे या देशाला लांछनास्पद आहे.

सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत. गांधीजी गुजरातचे सुपुत्र होते. मोदीजी महात्मा गांधींना फार मानतात असे त्यांना वाटते. त्यांच्या सत्तेच्या काळात गांधीविरोधी ओरड करणार्‍या गोडसेवाद्यांना दाबायला हवे होते. परंतु तसे घडताना दिसत नाही. पंतप्रधानांनी आपण गांधीजींच्यावर खरे प्रेम करतो हे दाखवण्याची मोठी संधी मिळाली आहे. ज्या काँग्रेसवाल्यांनी अनेक वर्ष या देशावर राज्य केले, सत्तेची फळे मनमुराद खाल्ली ते काँग्रेसवाले गांधीजींच्यावर होणार्‍या टीकेला उत्तर देताना दिसत नाहीत. ते गांधी टिकेवर जास्त बोलत नाहीत. ते शुद्धीवर नाहीत असेच म्हणावे लागेल. गांधीजींच्यावर अनेक वेळा गोडसेवाद्यांनी टीका केली पण हे काँग्रेसवाले कधी पेटून उठले नाहीत. त्यांना गांधीजींच्या बद्दल आपुलकी दिसत नाही.

गोडसेवादी लोक महात्मा गांधी यांच्यावर सतत दोन आरोप करतात. गांधीजी भारत व पाकिस्तान फाळणीला जबाबदार आहेत व दुसरा आरोप आहे की काँग्रेस पक्षावर दबाव आणून गांधीजींनी पाकिस्तानला 55 कोटी देण्यात भाग पाडले. हे दोन्ही आरोप साफ खोटे आहेत. गांधीजींना ठार मारण्याचे प्रयत्न 1934 पासून चालू होते. 1948 पूर्वी गांधीजींना चार वेळा ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. हे गोडसेवादी कधी सांगत नाहीत. पहिला प्रयत्न 25 जून 1934 रोजी झाला. या दिवशी महात्मा गांधी अस्पृश्यता प्रचार मोहिमेसाठी पुणे येथे नगरपालिका सभागृहात आले होते.

त्यावेळी बॉम्ब फेकून मारण्याचा प्रयत्न झाला होता. दुसरा प्रयत्न जुलै 1944 ला झाला. पाचगणी येथे गांधीजी आले होते. तेथे नथुराम गोडसे याने सुरा हातात घेऊन गांधीजींना मारण्याचा प्रयत्न केला. तिसरा प्रयत्न सप्टेंबर 1944 मध्ये झाला. सेवाग्राम आश्रमातून निघून रेल्वेने गांधीजी मुंबईला येणार होते. त्यावेळी आश्रमाच्या बाहेर गांधीजींना धक्काबुक्की झाली होती. यावेळी नथुराम गोडसे व ल.ग.थत्ते या दोघांनी जांबीयाने गांधीजींना मारण्याचा प्रयत्न केला. चौथा प्रयत्न 29 जून 1946 रोजी मुंबईहून गांधीजी पुण्याला येताना नेरळ कर्जत रेल्वे मार्गावर रेल्वेला अपघात करून गांधींना ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. या चारही वेळा फाळणी किंवा 55 कोटीचा विषय नव्हता.

गांधींना मारण्याचे कारण गांधी द्वेषाने पछाडलेल्या प्रवृत्तीने अजूनही कधी सांगितले नाही. गांधींना मारण्याचे खरे कारण वेगळेच आहे. गांधींची लोकप्रियता, कामाची क्षमता, देशभक्ती, जन माणसाच्या हृदयसिंहासनावरील विराजमानता गोडसेवाद्यांना डाचत होती. गांधींच्या लोकप्रियतेमुळे त्यांचा खून झाला असे म्हणावे लागेल. गांधींचे सर्वव्यापी नेतृत्व, बहुजन समाजातील त्यांची आदराची प्रतिमा, अस्पृश्यता मोहीम, पुढील काळात म्हणजे स्वातंत्र्यानंतर सत्ता बहुजन समाजाकडे जाईल या भीतीने गांधीजींना संपवण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा. गांधीजी मारूनही मरत नाहीत हे प्रतिगाम्यांचे दुखणे.

30 जानेवारी 1948 या दिवशी सायंकाळी पाच वाजता गांधीजी प्रार्थना सभेसाठी चालत जात असताना नथुराम गोडसे याने त्यांना अगदी समोरून गोळ्या घातल्या आणि गांधीजींचा खून केला. पोलिसांनी नथुरामला जागीच पकडले. गांधी खुनाचा खटला चालवण्यासाठी शासनाने एक विशेष न्यायालय स्थापन केले. आत्मचरन अग्रवाल (आय.सी.एस) यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. त्यांच्यासमोर गांधी खुनाचा खटला चालला. या खटल्यात आरोपी झालेले खालीलप्रमाणे – नथुराम विनायक गोडसे (वय 37, पुणे), नारायण दत्तात्रय आपटे (वय 34, पुणे), विष्णू रामकृष्ण करकरे (वय 37, अहमदनगर), मदनलाल कश्मिरीलाल पहावा (वय 20), शंकर किस्तया (वय 27, सोलापूर), गोपाळ विनायक गोडसे (वय 27, पुणे), दिगंबर रामचंद्र बडवे (वय 40, पुणे), विनायक दामोदर सावरकर (वय 66, मुंबई), डॉ. दत्तात्रय सदाशिव परचुरे (वय 47, ग्वाल्हेर) तसेच तीन आरोपी भूमिगत होते. गंगाधर दंडवते, गंगाधर जाधव, सूर्यदेव शर्मा हे सर्वजण ग्वाल्हेरचे. या खटल्याचा निकाल 10 फेब्रुवारी 1949 रोजी जाहीर झाला. सावरकर आणि बडवे निर्दोष सुटले. करकरे, पहावा, गोपाळ गोडसे, शंकर किस्तया व डॉ. परचुरे यांना जन्मठेप झाली. नथुराम गोडसे व नारायणा आपटे या दोघांना फाशी शिक्षा ठोठावली. या दोघांना मंगळवार 15 नोव्हेंबर 1949 रोजी सकाळी आठ वाजता फाशी देण्यात आली. गांधींना ठार मारणारे आरोपी जास्तीत जास्त महाराष्ट्रातील असावेत याचे वाईट वाटते. महाराष्ट्राला ते भूषणावह नाही.

गांधीजी महामानव होते. ती पारदर्शी जीवन जगले. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांशी समरस होणारे होते. काँग्रेसचा इतिहास म्हणजे गांधीजींचे जीवन म्हणता येईल. सशस्त्र मार्गाने साम्राज्यशाही जाणार नाही ही गांधीजींना ठाऊक होते म्हणून गांधीजी सत्याग्रही मार्ग स्वीकारला. स्वातंत्र्य चळवळीत जे लढले ते सत्ताधीश झाले. गांधी त्याला अपवाद होते. यातच गांधीजींचा मोठेपणा आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी बलिदान करणारे ते जगातील एकमेव नेता असावेत. गांधी म्हणजे चमत्कार असे शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाले होते. अस्पृश्यता मानवी जीवनाचा कलंक असून तो पुसण्याचा गांधीजींनी मनापासून प्रयत्न केला. तत्त्वासाठी बलिदान करण्याची हिम्मत असावी लागते ती गांधींनी दाखवली. गांधींची प्रतिमा देशातील कुठल्या पुढार्‍यांनी जोपासली नसून इथल्या सामान्य जनतेने सांभाळली आहे. चंद्र-सूर्य असेपर्यंत गांधीजी अमर राहणार आहेत. त्यांचे नाव कोणी पुसू शकत नाही. अशा या महान राष्ट्रपतीला सविनय अभिवादन.

2 Replies to “गांधीजी मारूनही मरत नाहीत हे प्रतिगाम्यांचे दुखणे

  1. लोकांच्या पूढे सत्य येणे महत्त्वाचं आहे. गांधी ची लोकप्रियता होतीच आणि अजून हि आहे. गोडसे पण गांधी वादी होता. पण गांधी नी अल्पसंख्यांक लोकांना आनंदी ठेवण्यासाठी हिंदू कडे दुर्लक्ष केले आणि भारत-पाक फाळणीला गांधीजी जबाबदार होते. फाळणी वेळी हजारो लोक कतली मध्ये मारले गेले आणि याचा जबाबदार गांधी च होते. त्याच्या आदेश नुसार अल्पसंख्याक लोक भारतात राहिले. त्यामुळं अजून हि जातीय दंगली अजून हि होत आहे. गांधी नी पूर्व पाक ते कराची असा भारतातून जाणारा महामार्ग पण प्रस्तुत केला होता. अश्या अनेक चुकीच्या धोरणामुळे गांधी वध केला गेला.

    1. आपणास चुकीची माहिती आहे कृपया आपले मत व्यक्त करताना त्याचा पुरावा द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *