बातमी

आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे (धरणाचे) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व जलपूजन


कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील


कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. आजरा तालुक्यातील मौजे आर्दाळ येथे जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार संजय घाटगे, श्री पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, पाटबंधारे कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, रोहित बांदिवडेकर, एस.आर. पाटील, अमोल नाईक, डी. डी. शिंदे, उपविभागीय अभियंता दिनेश खट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकऱ्याची सोय होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश येऊन आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचा लाभ घेऊन येथील शेतकरी या भागाचं सोनं करतील, असा विश्वास व्यक्त करुन या प्रकल्पासाठी योगदान दिलेल्या सर्व घटकांना त्यांनी धन्यवाद दिले. जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जलसंपदा विभागाचे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी, सर्पनाला, नागणवाडी, उचंगी व सोनुर्ले हे सर्व प्रकल्प जून 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले असून यासाठी गतीने कार्यवाही केली जाईल. मेघोली धरण फुटल्यामुळे झालेल्या नुकसान ग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी व्यक्तिशः प्रयत्न करणार असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी चिंता करु नये, असे आवाहनही मंत्री श्री पाटील यांनी यावेळी केले. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, येथील प्रकल्प ग्रस्तांच्या त्यागामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जलसंपदा विभागाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील वेळोवेळी बैठका घेऊन त्यासाठी पाठपुरावा करतात. यामुळे जलसंपदा विभागाचे राज्यातील सर्व प्रकल्प लवकरच मार्गी लागून शेतकऱ्यांची सोय होईल, असा विश्वास ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. आंबेओहोळ प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांबरोबरच पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण दूर होण्यास निश्चित मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. रिक्षा, ट्रक, टॅक्सी ड्रायव्हर, शेतमजूर आदी घटकांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने यांच्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन होण्याबाबत गणेशोत्सवानंतर बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी केले. या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र 33.84 चौरस किलोमीटर असून एकूण पाणीसाठा 35.11 दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणीसाठा 32.63 दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पामुळे 3 हजार 925 हेक्टर क्षेत्र (6 हजार 359 हेक्टर सिंचन क्षमता) सिंचनाखाली येणार आहे. धरणाची लांबी 2250 मिटर आहे. यामुळे आजरा व गडहिंग्लज या दोन तालुक्यातील 21 गावांना लाभ होणार आहे, असे श्री. सुर्वे यांनी सांगितले. आभार कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी मानले. आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण होण्यासाठी योगदान दिलेल्या अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार संजय पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *