बातमी

देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे – संजयसिंह चव्हाण

देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे -मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर दि.25 (जिमाका) : युवा पिढी ही देशाची शक्ती आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येक युवकाने मतदार नोंदणी करुन घेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त श्री स्वामी विवेकानंद महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, मैत्री संघटनेच्या अध्यक्ष मयुरी आळवेकर, श्री स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य आर.आर. कुंभार, तहसीलदार कल्पना ढवळे आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात निवडणुक प्रक्रिया, मतदार नोंदणी व मतदार जनजागृतीसाठी उत्कृष्ट काम केलेले अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, आपले व देशाचे उज्वल भविष्य घडवण्यात मतदान प्रक्रिया महत्वपूर्ण आहे. लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. कोल्हापूरचे नागरिक मतदानाबाबत जागरुक असून येथे इर्षेने चांगल्या टक्केवारीने मतदान होते, असे सांगून मतदारांनी कोणत्याही आमिषाला अथवा प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचे मूलभूत कर्तव्य पार पाडावे, असे ते म्हणाले.

अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले, मतदान प्रक्रियेत प्रत्येक मताला महत्त्व आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदार यादीत नावनोंदणी करुन घेऊन मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक मतदानाबाबत सजग असल्यामुळेच राज्यात सर्वाधिक मतदान या जिल्ह्यात होते. येत्या काळात आणखी जनजागृती करुन जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मयुरी आळवेकर म्हणाल्या, जिल्ह्यातील बहुतांशी तृतीयपंथी व्यक्तींना जिल्हा प्रशासनाकडून मतदार ओळखपत्र मिळाले आहे. तृतीयपंथीयांना मतदार ओळखपत्र मिळाले व मतदार यादीत नाव नोंदणी झाली त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा हक्क बजावता आला, ही बाब खूप आनंदाची आणि अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सोदाहरणासह सांगितले.
प्राचार्य आर. आर. कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले. आभार एनएसएस विभागाचे भरमगोंडा पाटील यांनी मानले.

One Reply to “देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे – संजयसिंह चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *