बातमी

जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day)

जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day) १४ जून २०२२

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यानी म्हटलं आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसऱ्याचा जीव वाचवू शकते. आज संपूर्ण जगभरात ‘जागतिक रक्तदाता दिन साजरा होत आहे. आजदेखील समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटना 14 जून रोजी ‘जागतिक रक्तदाता दिवस’ साजरा करत असते. रक्तदान केल्याने आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानने व नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे, असे जागतिक रक्तदाता दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. A-B-O या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते डॉ. कार्ल लॅन्डस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जागतिक रक्तदान दिन’ साजरा केला जातो.

रक्तदान कोण करु शकते, काय आहेत आवश्यक अटी ?

कोणतीही सुदृढ, सशक्त, रोग न झालेली व्यक्ती रक्तदान करू शकते. वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो. रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचे वजन 45 किलोहुन अधिक असावे. रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. रक्तदाताच्या नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत. गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत.

मानवी रक्ताबद्दल काही रंजक गोष्टी –

नुकत्याच जन्मलेल्या बालकामध्ये फक्त एक कप (जवळपास 250 ML) रक्त असते आणि तरुण माणसामध्ये जवळपास पाच लिटर रक्त असू शकते, म्हणजेच शरीराच्या एकूण वजनाच्या सात टक्के रक्त असते. प्लाझ्मा हे शरीरात प्रोटीन तयार करते आणि रक्ताला गोठण्यापासून वाचवते तर प्लेटलेट्स हे रक्ताला गोठण्यास मदत करते, यांच्यामुळेच जखम झाल्यानंतर काही वेळ रक्त आल्यानंतर रक्त येण्याचे बंद होते. 1 एमएल रक्तामध्ये 10 हजार पांढऱ्या रक्तपेशी आणि 2 लाख 50 हजार प्लेटलेट्स असतात. लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडाय ऑक्साइड (CO2) संपवतात. पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि व्हायरस यांच्यापासून वाचवतात त्यांना सैनिक पेशी सुद्धा म्हणतात. आपल्या नसांमध्ये 400 किलोमीटर प्रतितास या वेगाने रक्ताभिसरण होते. जर आपल्या शरीराने रक्ताला बाहेर पंप केले, तर हे रक्त 30 मीटरपर्यंत उडू शकते.

रक्तदानाचे फायदे

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रक्तसंक्रमणामुळे ब-याच लोकांचे व रुग्णांचे प्राण वाचू शकतात, परंतु बहुतेक वेळा रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना योग्य रक्तगट मिळणे तसेच रक्त सहजपणे पडताळून देणे कठीण होते. ब-याच वेळा, जीवघेण्या परिस्थितीत पीडित रुग्ण रक्तदानाद्वारे वाचू शकतो. परंतु हे देखील ठाऊकच आहे की रक्तदान केवळ जीव वाचविण्यासच मदत करत नाही तर रक्तदात्यासाठी त्याचे काही आरोग्यविषयक फायदे देखील आहेत.

1) वजन कमी करणे:

वेळेवर रक्तदान केल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि निरोगी प्रौढांमध्ये तंदुरुस्ती वाढते. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या मते, एक पिंट किंवा ४५० मिली रक्तदान केल्याने आपल्या शरीरास सुमारे 650 कॅलरी जळण्यास मदत करते. परंतु, म्हणून वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाऊ नये. आरोग्याचा कोणताही त्रास टाळण्यासाठी रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

2) हेमोक्रोमेटोसिस रोखतेः

रक्तदान केल्याने जोखीम कमी होते किंवा हेमोक्रोमेटोसिसच्या विकासास प्रतिबंध होऊ शकतो, अशी स्थिती ज्यामध्ये शरीर लोहाचे अत्याधिक शोषण करते. नियमित रक्तदान केल्यामुळे लोहाचे ओव्हरलोड कमी होते, म्हणूनच हे हेमोक्रोमाटोसिस असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. तथापि, रक्तदानाच्या पात्रतेच्या निकषांचे अनिवार्य मानदंड रक्तदात्याने हीमोक्रोमेटोसिसने पूर्ण केले आहेत हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

3)हृदयरोगाचा धोका कमी करा:

नियमित रक्तदान केल्याने लोहाची पातळी कमी राहते आणि त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शरीरात मोठ्या प्रमाणात लोह तयार होण्यामुळे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होऊ शकते जे हृदयविकाराचा झटका येण्यामागे कारण असू शकते.

4) कर्करोगाचा कमी धोका:

शरीरात लोहाचे जास्त प्रमाण म्हणजे कर्करोगाचे आमंत्रण होय. रक्तदानाद्वारे आपण लोहाची निरोगी पातळी राखू शकता आणि त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका कमी होईल.

(5) नवीन रक्त पेशींचे उत्पादन वाढवा:

रक्तदानामुळे नवीन रक्तपेशींचे उत्पादन वाढते. रक्तदान केल्यानंतर, अस्थिमज्जांच्या सहाय्याने आपल्या शरीरामधल्या कार्यप्रणाली ४८ तासांमध्ये काम करायला लागतात आणि नवीन रक्त पेशी तयार होतात. रक्तदानात गमावलेल्या सर्व लाल रक्तपेशी ३० ते ६० दिवसांच्या कालावधीत बदलल्या जातात. म्हणून, रक्तदान केल्याने महत्त्वपूर्ण आरोग्य टिकविण्यात मदत होते. अशा रीतीने या रक्तदानाचे फायदे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकांनी रक्तदान केले पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी पुढाकार घेऊन अनेकांना जीवनदान देऊया…

डॉ. एस. एफ. देशमुख

प्राचार्य – आरोग्य व कुटूंब कल्याण, प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *