बिद्री शीतकरण केंद्राजवळ अपघात
मुरगूड (शशी दरेकर) – गारगोटी -कोल्हापूर राज्यमार्गावर रविवारी सकाळी फिरावयास गेलेल्या दोन महिलानां दूध शीतकरण केंद्राजवळ भरधाव वाहनाने धडक दिली . या अपघातात शांताबाई नामदेव कुंभार (वय ७२) रा. बोरवडे कुंभारवाडा (ता. कागल) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या बरोबर असणाऱ्या आनंदी आनंदा परीट (वय ७०) रा. बोरवडे (ता. कागल) ही महिला जखमी झाली . याबाबतची फिर्याद अनिल तानाजी कुंभार यानीं मुरगूड पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी शांताबाई कुंभार व आनंदी परीट या दोघी रविवारी सकाळी फिरावयास गेल्या होत्या त्यावेळी गारगोटी कडून आलेल्या भरधाव मोटारीने ( एमएच ०९ जीएम ७२४३) दोघीनाही जोराची धडक दिली . यामध्ये शांताबाई दहा फूट अंतरावर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला व आनंदी यानां गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर मोटरचालक राकेशकुमार बाबूलाल परिहार ( महाडिक वसाहत रुईकर कॉलनी कोल्हापूर , मुळ गांव जालोरे राजस्थान ) मोटारीसह भरधाव वेगाने कोल्हापूर दिशेने निघून गेला.
जखमी आनंदी यानां गारगोटी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर शांताबाई कुंभार यांचा मृतदेहाची मुरगूडच्या ग्रामिण रुग्णालयात उत्तरणीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
राकेशकुमार परिहार यांच्या विरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसानी घटनास्थळाचा पंचनामा केला असुन पोलिस वाकळे अधिक तपास करत आहेत.