मुरगूडमधील सराफ व्यापाऱ्यांची पोलीस स्टेशनमध्ये बैठक
मुरगूड ( शशी दरेकर ) – बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्स वरील सशस्त्र दरोडा पार्श्वभूमीवर सराफ व्यवसाय चोरदरोडेखोरांचे लक्ष बनल्याने दक्षतेसह सुरक्षिततेची गरज निर्माण झाली आहे . याचा संदर्भ घेत मुरगूड पोलीस स्टेशन अंतर्गत गावांसह मुरगूड शहरातील सुवर्णकार आणि सराफ व्यावसायिक यांच्या बैठकीचे आयोजन मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले होते . मुरगूडचे एपीआय विकास बडवे यांनी यावेळी सराफ व्यावसायिकांशी चर्चा करतांना सराफ व्यवसायातील सुरक्षितते बाबत काही मार्गदर्शक सुचना केल्या.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, की व्यापारी बांधवांनी आपल्या दुकानात सोन्या-चांदीच्या मालाची सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे . यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे त्यांचे स्थान योग्य ठिकाणी ठेवणे ,बाहेरील बाजू व आतिल बाजू स्पष्ट कव्हर करणे, आपल्या दुकानात होणारी चोरी टाळण्यासाठी कॅमेरे बसवणे आवश्यक आहे . तसेच दुकानात अनोळखी व्यक्ती आल्यास त्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून आपल्या मौल्यवान वस्तू चोरल्या जाणार नाहीत याबाबत दक्ष रहाणे, दुकानाबाहेर संशयास्पद व्यक्ती असल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे, याबाबत दक्ष रहाणे तसेच आपल्या सोन्या चांदीचे मौल्यवान वस्तू याची सुरक्षिता ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळेस सर्व वस्तू व्यवस्थित ठेवणे, आपणास शक्य असल्यास सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे, रात्री दुकान बंद करताना कुलूप व्यवस्थित लावणे चोरीचा माल विक्रीसाठी कोणी घेवून आल्यास ताबडतोब पोलीस स्टेशनला कळविणे, रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग साठी येणाऱ्या पोलिसांना सहकार्य करणे, संशयित व्यक्ती वाटल्यास पोलीस स्टेशनला कळणे तसेच कुणीही चोरीचा माल किंवा संशयित व्यक्ती कडून सोने चांदी मोड घेवू नये, पोलीस आणि सराफ यांच्यातील त्वरीत संपर्कासाठी, माहितीसाठी मोबाईल ग्रुप तयार करणे अशा अनेक मार्गदर्शक सूचना यावेळी श्री बडवे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सुवर्णकार आणि सराफ यांना दिल्या.
यावेळी मुरगूडचे पीएसआय कुमार ढेरे यांच्यासह मुरगूड शहर सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष नंदू बेळेकर , मुरगूड मधील प्रसिद्ध सराफ किरण गवाणकर, किशोर पोतदार, प्रदीप वेसणेकर, प्रसाद रेंदाळे, निलेश वसणेकर, सिद्धेश पोतदार, रमेश वळीवडेकर यांच्यासह सराफ व्यापारी उपस्थित होते .