उद्या पासून लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक रस्त्याची उजवी बाजू सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद
२० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राहणार बंद
कागल (सम्राट सणगर) : कोल्हापूर वनवृत्तातील वनरक्षक (गट-क) भरतीप्रक्रीया सन २०२३ च्या अंतर्गत २४९ पदांच्या भरतीप्रक्रीया सुरू आहे. भरतीप्रक्रीयेअंतर्गत पात्र पुरुष उमेदवारांची ५ कि.मी. व महिला उमेदवारांची ३ कि.मी. धावण्याची परीक्षा/धाव चाचणी घ्यावयाची असून सदर धावचाचणी स्पर्धात्मक स्वरूपाची व बाद पद्धतीची असल्यामुळे या चाचणीमध्ये पारदर्शकता ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
धावचाचणीकरिता पात्र झालेल्या ८५२७ महिला व १४०३५ पुरूष उमेदवारांची दि. २०-०२-२०२४ ते दि. २८-०२- २०२४ चे कालावधीत पंचतारांकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कागल येथील राष्ट्रीय महामार्ग नंबर ४८ लगतचा अंतर्गत रस्ता लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक पर्यंत २.५ किमी या मार्गावर धावचाचणी आयोजित केली आहे.
त्याकरिता सर्व संबधित विभागांच्या आवश्यक पूर्वपरवानगी या कार्यालयाचे स्तरावरून घेतलेली आहे. दि. २०-०२-२०२४ ते दि. २८-०२-२०२४ चे कालावधीत पंचतारांकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कागल येथील राष्ट्रीय महामार्ग नंबर ४८ लगतचा अंतर्गत रस्ता लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक पर्यंत २.५ किमी उजवी बाजू सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.
वाहनधारकाच्या सोईसाठी डावीकडील बाजू उपलब्ध असून डाव्या बाजूने दोन्ही दिशेची वाहतूक वळविणेत येणार आहे. तरी उपरोक्त मार्गावरून प्रवास करणा-या सर्व वाहनधारकांनी सदर बदलाची नोंद घ्यावी असे वनविभाग कोल्हापुर यांनी जाहीर केले आहे.