बातमी

संयुक्त महाराष्ट्र लढयातील महिला शाहिरींची कामगिरी

1 मे 1960 रोजी अनेक हुतात्म्यांच्या बलीदानानंतर ‘महाराष्ट्र राज्य’ अस्तित्वात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनतेने उस्फूर्तपणे मोठा सहभाग घेतला. पुरुषांबरोबर स्त्रियांचाही यात मोठा वाटा होता. आचार्य अत्रे यांनी या स्त्रियांचा मुक्तकंठाने ‘रणरागिनी’ असे बिरुद देऊन गौरव केला. या लढ्यात शाहिरांनी पोवाडे, गाणी, गीते रचून कलापथकाद्वारे लोकांपुढे सादर केली. याचा चळवळीला मोठा फायदा झाला. काही अग्रभागी असलेल्या शाहिर यामध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर द.ना. गव्हाणकर या तिघांनी तर आपल्या अभूतपूर्व शाहिरी कार्यक्रमांनी महाराष्ट्राला चेतना दिली. तसेच लोकशाहीर आत्माराम पाटील, शाहीर साबळे यांनीही मोलाची कामगिरी केली. या काळात अनेक शाहिरांच्या प्रतिभेला उधाण आलं होतं. शाहीर लीलाधर हेगडे, मालेगावचे इक्बाल, सखाराम जोशी, नगरचे किसन गोरे, मनमाडचे यशवंत चकोर, धुळ्याचे भिकाजी पाटील, नाशिकचे दत्ता कांची, कोल्हापूरचे सपकाळ – लोखंडे आदीनी यात आपला सहभाग नोंदवला. यामध्ये महिला शाहिरीही मागे नव्हत्या.

अनुसया आनंदराव शिंदे – यांच्या घरात (नांदेडकडे) सत्यशोधकी संस्कार होता. तसेच महत्त्वाचे म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मामा होते. त्यामुळे स्वातंत्र्याचे व चळवळीचे वारे लहान वयापासूनच अंगात संचारले होते. त्यांनी सरळ शायरी करायला प्रारंभ केला. सावित्रीबाई फुले प्रमाणे जननिंदा सोसली. अफाट लोकजागृती करणारी पहिली महिला शाहीर असा त्यांचा बोलबाला झाला. महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. त्याग केला. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई उर्फ मर्डरजी यांनी शिंदे कुटुंबाला हदगाव (नांदेड) येथून चोवीस तासाच्या आत हद्दपारीची नोटीस बजावली होती. जनतेने त्यावेळी शिंदे कुटुंबाचा सत्कार केला. बैलगाडीतून मिरवणूक काढली. परभणीकडे कलमनुरी गावी पोहोचविले. येथून अनेक गावोगावी कार्यक्रम झाले व लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यांच्या पोवाड्याची एक झलक..

अनुसया आनंदराव शिंदे

एक पाय तुमच्या गावात
दुसरा तुरुंगात किंवा स्वर्गात
तमा नाही याची अनुसयाला ।
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे।
याच साठी वाणीचा दिवा चेतविला ।
जी जी जी जी…॥

अनुसया आनंदराव शिंदे

मोरारजी कडाडले नंतर अनुसयाला कुटुंबासह नऊ जिल्ह्यातून हद्दपारीची नोटीस बजावली. आर्थिक ओढाताण होऊ लागली. जुने कार्यकर्ते मदतीला धावले. मग गुप्त कार्यक्रम सुरू झाले व नागपूरकडे चांगली साथ मिळाली.

महाराष्ट्र देश हा न्यारा
हा तर भारतभुचा
गाऊया गुणगान
शुरविरांची ही खाण
भारतभुची ही शान

काही गाणी बर्‍याच वेळा वन्स मोअर करावी लागत. भारत सरकार आकाशवाणीने यांचे रेकॉर्डिंग केले. याशिवाय इतर अनेक हृदयस्पर्शी रचना त्यांनी रचल्या-गायल्या. डॉ. आंबेडकर यांनी त्यांचा गौरव केला. ‘आयाबहिणी’, ‘तापलं रक्त’, ‘माथ्यात वेड’ अशी जिवंत मराठी गीतं

इंद्रायणी आत्माराम पाटील – मुंबईच्या राहणार्‍या पण योग असा की सेनापती बापट यांच्या घरा शेजारीच राहत त्यामुळे समाजसेवेचा संस्कार झाला. इंद्रायणीच्या घरातही आईकडून संस्कार झाले होते. पुढे प्रमिला दंडवते यांची ओळख झाली. एकदा सत्याग्रहात आग्रहाने भाग घेतला. हातात झेंडे घेणे, मुंबई-बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकी-डांग सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या. शाहीर आत्माराम पाटलांच्या डांगचा एक पोवाडा होता. इंद्रायणी ताईंना गायनाची सवय होती. तो पोवाडा 150 ओळींचा होता. त्याची चाल लोकगीताची होती. इंद्रायणीने पोवाडा पाठ करण्याचा सराव केला. डांग भागातील लोकही येणार होते. शिवाजी पार्कवर कार्यक्रम होता. इंद्रायणी पंचवीस मिनिटात अगदी खड्या व त्या चालीवर पोवाडा गाऊन म्हटला आणि चमत्कार झाला. पोवाडा झाल्यावर आचार्य अत्र्यांनी व्यासपीठावर इंद्रायणी यांची पाठ थोपटली. शाहिरीच्या माध्यमातून इंद्रायणी व आत्माराम पाटील यांनी चळवळीचे रान गर्जून टाकले. त्यांचा त्याग असा की प्रवास खर्च, दौरे, मानपान ते घेत नसत व हे सगळे कलापथक सांभाळताना त्यांना सुमारे चार लाख रुपये कर्ज झाले. उभयतांनी ते कर्ज आयुष्यभर फेडले. त्यांच्या महाराष्ट्र प्रेमाचा व सामान्य त्यागाचा कोणत्या शब्दात गौरव करावा.

लिलूताई म्हापणकर – वसईकडील राहणारे कुटुंब. घरात गांधीवादी व सेवाभावी संस्कार झालेले होते. वसईत महात्मा गांधीजी आले तेव्हा भेट घेतली. त्या निर्भय बनल्या. तेंव्हा वसई भागात दारिद्र्य होते. विशेष म्हणजे त्या शीघ्र कवयित्री होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांची गीते लोकप्रिय झाली. पाळणे, डोहाळे, तिळगुळ अशी गाणी तसेच मोरारजी देसाई उर्फ मर्डरजी यांचे धिक्कार करणारे गाणी अफाट गाजले.

दाखविला मराठी बाणा । महाराष्ट्र चढवी माना
सत्याग्रही देऊनी ठाणा ।
दिल्लीला आणिला भाना ।
मर्डरजी गेला गेला
जय महाराष्ट्र बोला । जी जी ।
विरोध करून द्वीभाषिकाला मिळऊया मुंबईला जी जी जी ॥

लिलूताईबाईंकडे आर्तता, ध्यास, तळमळ, घोषणांचा मारा सर्व काही होते. बाईंचे एक गाणे ऐकून आठ-नऊ हजारांचा समुदाय पेटून उठत असे.

कुसुमताई गायकवाड

कुसुमताई गायकवाड – नाशिककडील मनमाड येथे राहणार हे कुटुंब. गाण्याचे व नाटकांचे संस्कार घरातून झाले होते. राष्ट्रसेवादलाचा अनुभव होता. शाहीर चकोर बरोबर स्वतंत्र कलापथक उभे केले. नेत्यांच्या भाषणाआधी त्यांची गाणी होत. नाशिक सोडून ठाणे येथे स्थलांतर केले. त्यांचे कर्तृत्व पाहून खुद्द शाहीर अमर शेख त्यांच्या पार्टीत सामील झाले व गाण्यांच्या चाली शिकू लागले. शाहीर अण्णाभाऊ साठे यांची कवणे वापरली जात. कधी आचार्य अत्रे, डांगे सभेला असत. ‘गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती’ हे गीत अनेकवेळा म्हणावे लागे. कुसुमताईना तुरुंगवासही भोगावा लागला. कर्मवीर काकासाहेब यांनी त्यांचा व त्यांच्या सहकार्‍यांचा भव्य सत्कार घडवून आणला. त्यामध्ये मिळालेले मानधन कुसुमताईनी संयुक्त महाराष्ट्र समितीला उदारपणे अर्पण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *