बातमी

छत्रपती संभाजीराजे यांच्या आमरण उपोषणाला करनूर येथील सकल मराठा समाजाचा पाठिंबा देऊन एक दिवसाचे साखळी उपोषण

कागल( विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असणाऱ्या आमरण उपोषणास पाठिंबा देऊन, सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून उपोषणास सुरुवात करण्यात आले.

करनूर येथील उपोषण हे कागल तालुक्यातील पहिले साखळी उपोषण आहे. सकल मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास करनूर येथून शंभर कार्यकर्ते मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेले छत्रपती संभाजीराजे यांचे आमरण उपोषणास जाणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच आज कागल येथे उपोषणास बसणार असल्याचे ही सांगण्यात आले.

सकल मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे…

  1. ESBC व SEBC आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे, त्याच पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी.
  2. सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करुन सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे.
  3. आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा वाढवावी भरिव आर्थिक निधीची तरतुद करुन महामंडळाकडे पैसे वर्ग करावेत. सद्या या महामंडळाला पूर्णवेळ कार्यकारी संचालक व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारे संचालक मंडळ नेमणे आवश्यक आहे .
  4. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तात्काळ सुरु करावे.
  5. कोपर्डी खून खटल्याची लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी शासनाने पाठपुरावा करुन आरोपींना फाशी होण्यासाठी आग्रही रहावे.
  6. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आरक्षण आंदोलनातून ज्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी.
  7. आंदोलन करणाऱ्या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने काढलेल्या नव्या शासन निर्णयात झालेल्या मालमत्तेचे नुकसान भरपाई बाबत उल्लेख आहे त्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे ते गुन्हे मागे घ्यावेत.आता नव्याने मुंबई पोलिसांनी २०१७ मध्ये निघालेल्या बाईक रॅली च्या सहभागी सर्वावर नोटीसा काढलेल्या आहेत. ते देखील रद्द करावेत.
    या सर्व मागण्यासाठी उपोषण करण्यात आले.

याप्रसंगी जयसिंग घाटगे, सचिन घोरपडे, आनंदा पाटील, अशोक शिरोळे, सुनील गुदले, कुमार पाटील, जयवंत चव्हाण,भाऊसो नलवडे, वैभव आडके, शिवाजी घोरपडे, अनिकेत भोसले, राजू चव्हाण, सनद खराडे, रोहित नलवडे, रोहित जाधव, ओंकार भोसले, सौ. अनिता शिरोळे आदी अनेक मराठा समाजाचे विविध संघटनांचे प्रतिनिधी तथा समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *