लेख

राष्ट्रीय जंतनाशक दिन

कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून दि. 10 ऑगस्ट “राष्ट्रीय जंतनाशक दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात 29 टक्के आढळून आले आहे. त्याच अनुषंगाने राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातून दोनदा राबविण्यात येतो. जंतनाशक मोहिमेमुळे बालकांमधील रक्ताक्षय, अशक्तपणा व कुपोषणावर नियंत्रण तसेच बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास होणे याचा समावेश आहे.

“राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यासाठी शाळा व अंगणवाडी या संस्था विशेष भूमिका बजावत आहेत. त्यामध्ये सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महानगरपालिका व सर्व खासगी अनुदानित शाळा त्याचबरोबर सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे यांचा समावेश आहे.

अल्बेंडोझॉल ही कृमिनाशक गोळी घेण्याची पद्धत प्रत्येक वयोगटानुसार वेगळी आहे. आजारी बालकांना जंतनाशकाची गोळी देऊ नये, जंतनाशकाची गोळी लहान मुलांना तशीच गिळण्यासाठी सांगू नये व गोळी घरी खाण्यासाठी पालकांच्या हातात देऊ नये जेणेकरून या मोहिमेंतर्गत बालकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नयेत, असे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

अल्बेंडोझॉल ही लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी सुरक्षित जंतनाशकाची गोळी आहे. जंतनाशक औषधीमुळे होणारे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे आहेत त्यात सौम्य प्रमाणात चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे किंवा डोके दुखी, पोटदुखी व थकवा यांचा समावेश आहे. हे दुष्परिणाम जंत संसर्गामुळे व त्यावर होणाऱ्या औषधाच्या परिणामामुळे होतात. ते तात्पुरते असून शाळा व अंगणवाडी केंद्रावर सहजगत्या हाताळण्यासारखे आहेत. जंत नाशक गोळी मुलांना दिल्यानंतर अशी लक्षणे निदर्शनास आल्यास ताबडतोब 104 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा यासाठी जागृती करण्यात येत आहे.

जंतनाशक गोळीच्या सेवनाने मुलांमधील कृमीदोष नष्ट होण्यास मदत होईल. कृमीदोष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा मूळ उद्देश 1 ते 16 वयोगतील सर्व मुले व 6 ते 19 वर्ष वयोगटातील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुलां-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देणे हा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कृमीदोष हे कुपोषण व रक्तशयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ ही खुंटते.

राष्ट्रीय जंतनाशक दिवस राज्यामध्ये आरोग्य विभागातर्फे 10 ऑगस्ट हा जागतिक जंतनाशक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त 1 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक औषध देऊया, सशक्त व सुदृढ करुया… जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये 1 ते 14 वयोगटातील जवळपास 68 टक्के मुले असून त्यातील 28 टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून (कृमी) धोका आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव, या कृमीदोषांचा संसर्ग मुलांना दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होत होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक असून, मुलांना आरोग्याच्या दृष्टीने अशक्त करणारा आहे.

कृमीदोषामुळे रक्तक्षय आणि कुपोषण तर वाढतेच, परंतु त्यामुळे बालकाची बौध्दिक व शारीरिक वाढही खुंटते. भारतामध्ये 6 ते 59 महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येकी 10 बालकांमागे 7 बालकांत रक्तक्षयाची लागण होते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. 15 ते 19 वर्षे वयोगटातील 56 टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व 30 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. पाच वर्षांखालील कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या बालकांची टक्केवारी सुमारे 34 टक्के आहे. मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमिदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात सुमारे 28 टक्के आहे. बालकांमधील कृमिदोषाचे प्रमाण कमी व्हावे व बालक सशक्त व सुदृढ बनावे यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातून दोनदा, 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट रोजी राबविण्यात येतो. 1 ते 6 वर्षे वयोगटातील सर्व बालके, 6 ते 19 वर्षे वयोगटातील शाळेत जाणारी व शाळेत न जाणाऱ्या मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी (औषध) देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे.

10 फेब्रुवारी रोजी ज्या बालकांना जंतनाशक औषध देण्यात आले नाही, अशा बालकांना 15 फेब्रुवारी रोजी जंतनाशक औषध देण्यात येते. महाराष्ट्रात उस्मानाबाद, नांदेड, भंडारा, गोंदिया, नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका, पालघर जिल्ह्यातील वसई, वाडा व पालघर तालुका व नागपूर ग्रामीण भाग वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये 1 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक औषध देण्याची मोहीम राबविण्यात येते.

जंतनाशक मोहिमेमध्ये 1 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना 200 मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. 2 ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना 400 मि.ग्रॅ.गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून देण्यात येते. 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना 400 मि. ग्रॅ. गोळी चाऊन खाण्यास किंवा पावडर करुन पाण्यात विरघळून देण्यात येते. 6 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना 400 मि. ग्रॅ. गोळी चाऊन खाण्यास देण्यात येते. जंतनाशक औषध लाभार्थ्यालाच दिले जावे यासाठी मोहिमेमध्ये देण्यात येणाऱ्या औषधाची गोळी लाभार्थ्याच्या अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या हातामध्ये किंवा संबंधितांना घरी घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

ज्या बालकांमध्ये कृमिदोष मोठ्या प्रमाणावर आहे अशांना औषधामुळे मळमळणे, डोकेदुखी अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. परंतु त्यामुळे घाबरु नये. हे जंतनाशक औषध केंद्र सरकारने आरोग्यविषयक सर्व तपासण्या करुन उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे ते सर्वार्थाने सुरक्षित आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेमध्ये सहभागी होणे सर्व पालकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींना या मोहिमेमध्ये जंतनाशक औषध घेण्यास प्रवृत्त करावे, येणारी पिढी सशक्त आणि सुदृढ करावी,

ग्रामीण भागात तर 80-90 टक्के मुलांच्या पोटात जंत असतात. माणूस खातो त्यातले बरेच अन्न त्याच्या पोटातले जंत खाऊन टाकतात. त्यामुळे बरेच लोक अशक्त, कुपोषित होतात. जंतांचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक मुख्यत: पचनसंस्थेत वाढणारे तर दुसरे यकृत, स्नायू वगैरे इतर ठिकाणी वाढणारे. पण सर्वसाधारणपणे पचनसंस्थेत वाढणा-या जंतांनांच जंत म्हणण्याची पध्दत आहे. या प्रकरणात आपण फक्त पचनसंस्थेच्या जंतांबद्दल शिकू या.

आपल्या देशात पचनसंस्थेच्या जंतांचे मुख्य प्रकार चार-पाचच आहेत. या सर्व जंतांची अंडी विष्ठेतून सगळीकडे पसरतात. या अंड्यांतून सूक्ष्म कृमी बाहेर पडून तोंडावाटे अथवा त्वचेवाटे (पावलातून) परत नवीन माणसाला जंताची बाधा होते. यांतले काही जंत त्यांच्या जीवनचक्रात रक्तावाटे फुप्फुसात येतात. त्यामुळे खोकला येतो. या सर्व जंतांचे जीवनचक्र अस्वच्छतेवर अवलंबून असते. मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावली गेली तर जंतांची बाधा होत नाही. म्हणून जंताच्या उच्चाटनासाठी मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे. घरोघरी सुरक्षित संडास हाच यावरचा खरा उपाय आहे.

लक्षणे व चिन्हे –

मोठे जंत (गोल जंत), लहान जंत (कृमी) हे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. अशी मुले अशक्त असतात. ही मुले लवकर दमतात. वाढ खुंटू शकते. पोटात बारीक दुखत राहणे. पातळ जुलाब होणे किंवा शौचास साफ न होणे किंवा उलटया होणे. कधी कधी मोठे जंत खूप झाल्याने आतडयाची वाट बंद होऊन उलटया व पोटदुखी होऊन, मृत्यू येऊ शकतो. यापैकी आकडेकृमी आतडयातून रक्त शोषतात. त्यामुळे रक्तपांढरी (ऍनिमिया) होते. काही प्रकारच्या कृमीमुळे गुदद्वाराजवळ खाज सुटते. (कारण बारीक कृमी अंडी घालायला गुदद्वाराशी येतात)

उपचार –

तात्पुरता उपचार म्हणून जंत पडून जाण्यासाठी औषध द्यावे. जंतांवर अल्बेंडाझोल गोळया गुणकारी आहेत. डोस दिवसातून दोन गोळया याप्रमाणे तीन दिवस. अल्बेंडाझोल औषध याच जातीचे आहे. पण त्याची एकच गोळीचा डोस पुरतो. मैवेंडाझोल पेक्षा हे थोडे महाग पडते. या गोळयांबरोबर एरंडेल, त्रिफळा चूर्ण किंवा तसेच एखादे रेचक द्यावे, म्हणजे जंत बाहेर पडतात.

याच प्रकारे एक- दोन आठवड्यानंतर परत उपचार करावा. मात्र अस्वच्छतेमुळे काही काळानंतर जंत परत होतात. मुलांची नखे वारंवार कापणे हे प्रतिबंधासाठी आवश्यक आहे. या दिवशी सर्व बालकांना जंतनाशक गोळी (औषध) देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश साध्य होईल.

प्राचार्या, आरोग्य व कुटूंब कल्याण, प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *