लेख

पुरोगामी चळवळीची प्रेरणा ‘संत रोहिदास’

सामाजिक क्रांतीचे प्रणेते, संत शिरोमणी गुरु रोहिदास

सामाजिक क्रांतीचे प्रणेते, संत शिरोमणी गुरु रोहिदास यांचा जन्म भारत देशात १५ फेब्रुवारी १३९८ मध्ये झाला. जन्माचा दिवस रविवार असल्याने त्यांचे नाव ‘रोहिदास’ असे ठेवण्यात आले. काशी जवळ गोवर्धनपूर या गावी ते जन्माला आले. यांचा जन्म झाला त्यावेळी देशात जातीवाद, वर्णवाद, रूढी, परंपरा यामुळे सामान्य बहुजन समाज मरणप्राय यातना भोगत होता.

ते चर्मकार या समाजातील असल्याने रोहिदासही आपल्या वडिलांना चामडी वळवण्यास मदत करीत असत. रोहीदासाना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते पंजाबी भाषेत रविदास किंवा रेयादास, हिंदीमध्ये रविदास, राजस्थान व महाराष्ट्र रोहिदास या नावाने संबोधले जाते. या वेगवेगळ्या नोंदीमुळे संत रोहिदास एका राज्यातील संत नव्हते तर सबंध भारतात त्यांचा संचार होता.

घरामध्ये स्वतः आपला व्यवसाय करून आपले कुटुंब ते चालवित असल्याने श्रमाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. लहानपणापासूनच त्यांची अध्यात्माकडे ओढ होती. त्यांचे वडील रघुनाथ हे अध्यात्माकडे ओढले गेले असल्याने त्यांच्या घरी साधुसंतांचे येणे-जाणे असायचे. त्यांच्या चर्चेचा परिणाम बालवयातच रोहिदास यांच्यावर झालेला होता. रोहिदास यांना फार शिक्षण घेता आले नाही. पण इतर साधुसंतांप्रमाणे ते ज्ञानी होते.

आंतरिक ज्ञानाने त्यांनी विद्या मिळवली होती. हिंदू धर्मामध्ये इतक्या जाती पाती कशा असा लहानपणीच त्यांना प्रश्न पडला होता. त्यामुळे जातिभेदाविरुद्ध आपण संघर्ष करावा असा निश्चय त्यांनी केला. काशीतील ब्राह्मण वर्गाची कीर्तने ऐकून ते अस्वस्थ होत. रोहिदासांच्या काळात मनुस्मृतीचे राज्य होते. ब्राह्मणी धर्मात वेद, पुराण, स्मृती वाचन करण्यास ब्राह्मण सोडून इतरांना अधिकार नव्हता. तसेच इतरांना देवालयात जाउन देवाची पूजा करायची बंदी होती. हे सर्व रोहिदास यांनी पाहिले आणि त्यांनी अस्पृश्यता, अमानवता, अन्याय, असुरक्षितता या विरुद्ध जन्मभर संघर्ष करण्याचा निश्चय केला.

हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली पाहिजे असे त्यांना वाटत होते. बुद्धांनी सांगितलेल्या ‘अत् दीप भव’ म्हणजे ‘स्वयंप्रकाशित व्हा’ या तत्त्वाप्रमाणे त्यांनी स्वतःला झोकून दिले. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या अनेकांना सनातन्यांनी ठार मारले. अनेकांचे निर्घुण खून केले. याची जाणीव रोहीदासाना होती. परंतु आपल्याला जमेल तेवढे बहुजनांसाठी काम करायचे असे त्यांनी ठरवले.

महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजसुधारकांनी संत रोहिदास यांचीच परंपरा पुढे चालवली असे म्हणता येईल. अलीकडे समता आणि स्वाभिमानाचे आंदोलन, भाईचारा म्हणजेच बंधूभाव वाढवा आंदोलन काशीराम यांनी घेऊन ती परंपरा चालवण्यासाठी थोडासा प्रयत्न केला. शीख समाजाच्या ‘गुरु ग्रंथसाहेब’ मध्ये संत रोहिदास यांची चाळीस पदे आहेत.

संत रोहिदासांच्या विचाराने तुकोबाराया, गुरू नानक, कबीर, एकनाथ महाराज प्रभावित झाले. आज शीख समाजाची प्रचंड मोठी प्रगती झाली. त्याची प्रेरणाही संत रोहिदास होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो गुलामगिरी विरुद्ध लढेल’ ही प्रेरणा संत रोहिदास सारख्या संतांकडून घेतली असे म्हणता येईल. काश्मीर, कर्नाटक, बिहार, राजस्थान अशा अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या रूढी-परंपरा फेकून द्या असा जन्मभर रोहिदास यांनी प्रचार केला. समतेचे नायक महात्मा फुले, मानव मुक्तीचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुरोगामी विचाराचे राजर्षी शाहू महाराज हे समाजसुधारक संतांच्या विचारांचीच देणगी आहेत.

संत तुकोबारायांचे कीर्तन छत्रपति शिवरायांनी ऐकले. मुसलमान असूनही रामाची भक्ती करणारे संत कबीर, उपेक्षित समाजात जन्म घेऊन पुरोगामी विचारांचा प्रसार साऱ्या भारत देशात करणारे संत रोहिदास ही मंडळी देशाचा अनमोल ठेवा आहेत. भारतीय संत परंपरा जगात सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्यात मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. तुकोबांनी तर माणसांबरोबर पशुपक्ष्यांनाही महत्त्व दिले. संतांची अखंड परंपरा टिकविण्याची जबाबदारी समाजावर आहे. संत रोहिदास यांची विचारधारा पुरोगामी होती. यांचे विचार आजच्या काळातही गरजेचे आहेत. ते पोषक आणि हितावह आहेत.

– दलितमित्र एस. आर. बाईत (मु.पो. सुरुपली, ता. कागल ) मो.: ९०११५९६१८३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *