लेख

प्रसिध्द ग्रामदैवत श्री गहिनीनाथ उरुस संपूर्ण माहिती

पुराण प्रसिध्द सिध्द पुरुष महंत नवनाथ पैकी गहिनीनाथ उर्फ गैबीपीर यांची प्राचीन पवित्र समाधी आहे. विजापूरचा बादशहा अब्दुल मुजावर इस्माईल बिन युसुफ आदिलशहा यांची कारकिर्द इ. स. 535 च्या दरम्यान कागलकरांचे पुर्वज भानाजी उर्फ तुळोजी हे उदयास आले. त्यांना कागल प्रांताचा बंडखोर देसाई बहादूरखान याचा बिमोड केल्याबद्दल कागल प्रांताची देसगत देण्यात आली. याच सुमारास तालीकोटच्या प्रसिध्द लढाईत आपली तलवार गाजविलेले वीर पहिले बाजीराव उर्फ पिराजीराव जन्मास आले.

हा आपला भाग्योदय श्री गहिनीनाथ कृपाप्रसादानेच झाला अशा श्रध्देने तुळोजीने श्री गहिनीनाथ कुलदैवत मानून त्यांच्या पुण्यस्मरणार्थ वार्षिक महोत्सव सुरु केला. त्यानंतर कागल सिनियरचे संस्थापक, इतिहास प्रसिध्द पुरुष सखाराम यांनी इ. स. 1801 साली कागलची स्वतंत्र जहागीर संपादन केल्यापासून या उत्सवास अधिकच महत्वप्राप्त झाले. दिवाळीला जोडूनच हा महोत्सव (उरुस) येत असलेने कागलमध्ये दिवाळी फार मोठ्या आनंदात, उत्साहात पार पडते.

श्रीमंत यशवंतराव घाटगे कागलकर यांचे कारकिर्दीत छत्रपतींनी दि. 16 नोव्हें. 1826 रोजी दर्ग्यातील झांज, घटिकापात्र, मोठी कढई, पातेली, नगारा व तंबोरा लुटून नेला. या पीरांचा उल्लेख नवनाथ या चरित्रग्रंथात ही आढळून येतो. या पिरासंबंधी माहिती 1801 पासून बरीचशी मिळते. कागलकरांना आदिलशाहीकडून जहागिरी मिळाल्यापासून त्यांच्या सरकारी कागदपत्रावर श्री नाथप्रसन्न व श्री गैबीप्रसन्न असे शिक्के वापरण्यात आले आहेत. या पीरास सिध्दनेर्ली, कागल, बाचणी, रुई, पिंपळगाव खुर्द या ठिकाणी सुमारे 80 एकर जमीन आहे. ही जमीन मुस्लिम पुजाराकडे आहे या शिवाय ज्या तेली घराण्यामुळे या पिराचे अस्तित्व प्रकट झाले. त्या पिराची म्हादू तेली यांचे घराण्याकडे काही जमीन आहे.

या पिरासंबंधी एक दंतकथा आहे. आदिलशाहीच्या पूर्वी या समाधीसमोर एक तेल्याची बाई नियमित पणती लावून ठेवीत असे. पूर्वेच्या बाजूस जे जुने प्रचंड चिंचेचे झाड आहे त्या ठिकाणी हत्ती बांधत होते. ज्या सत्पुरुषाच्या वास्तव्यानेही जागा पुणीत झाली. त्याच्या प्रभाव हत्तीच्या स्वभावरही झाला. तेलीबाईच्या या हत्तीस रोज एक मलिद्याचा लाडू चारीत असे. त्या तेलीनबाईस सोंड वर करुन हत्ती नमस्कार करी. हा चमत्कार पाहून या समाधीस्थानाचे महत्व वाढू लागले त्या तेलणीस राज्यमान्यता मिळाली. तिच्या घराण्यास उत्पन्नही मिळाले.

या समाधीवर पहिला गलेफ घालणेचा मान ही मिळाला तो आजतागायत मान आहे. हल्ली चौथर्‍यावर असलेली समाधी ही केवळ दर्शनी समाधी असून तिच्या खालील भागात या साधू महंतांची मूळ समाधी आहे. यास पूर्वी गंधरात्रीदिवशी खाली उतरुन समाधीस गंधलेपन करीत असत. ते प्रवेशद्वार खाली बंद आहे. या समाधीचे मुळ पुजारी तेली घराणे होते. परंतु कालांतराने आदिलशाहीत पुजा-आर्चा खास मुजावर मंडळीकडे सोपवण्यात आली. त्यानंतर कागलकरांनी मिरजेहून खास पुजेसाठी मुजावर घराणे आणले. या उत्सवाची सुरुवात पुष्य नक्षत्रावर काढणी चढविल्यानंतर कार्तिक शु॥ पाडव्याच्यादिवशी होते. दुसर्‍या दिवसांपासून रोज रात्री गलेफ घातला जातो. पहिला गलेफ तेल्याचा, दुसरा गावकर्‍यांचा, तिसरा ज्यु. कागलकरांचा, चौथा सिनियर कागलकरांचा असे चार गलेफ घालण्यात येतात. या साधुपुरुषाच्या समकालीन ह्याचाच मित्र म्हणून साधुपुरुष शेखशिराज यांच्या समाधीस पाचवा गलेफ घालण्यात येतो. ही समाधी सुभाष चौकात आहे. दिपावली पाडव्यापासून श्री गहिनीनाथ उरुसास सुरुवात होते. दुसरा मानाचा गलेफ चावडीतून पुजा व भजन करुन रात्री 12 नंतर आणला जातो. अलिकडे पाचवा गलेफ श्री छत्रपती शाहू कारखाना यांचेमार्फत घातला जातो. चौथा गलेफ उरुसाचा मुख्य (मोठा) उरुस असतो.

सन 2008 साली नामदार हसनसोा मुश्रीफ यांच्या आमदार फंडातून गहिनीनाथ (गैबीचा) जिर्णोध्दार करणेचे काम केले. मुख्य गैबीचा चबुतरा 40’ लांब 40’ लांब रुंद असून त्यावर मार्बल फरशी बसविली आहे. या चबुतर्‍यावर तुरबतीच्या पश्चिम बाजूस आदिलशाही काळापासून पुरातन तीन कमानी आहेत. त्यात मध्ये तीन पायर्‍या असणारे व्यासपीठ आहे. त्यावर ग्रंथ, कुराण आणि इतर धार्मिक, पुजा साहित्य ठेवतात. त्यास मेंबर असे म्हटले जाते. या पुरातन कमानी आता सुशोशित केल्या आहेत. खाली चबुतर्‍याचा भोवताली 85’ लांब 55’ रुंद भव्य आणि अप्रतिम मंडपाचे बांधकाम झाले आहे.

या मंडपास 40 गोल पिलर असून 32 आकर्षक कमानी आहेत. या मंडपात चबुतर्‍याच्या सभोवती तांबडी मार्बल फरशी घातली आहे. पूर्वेस आदिलशाही कालीन 12 कमानी आहेत व दक्षिणेस भव्य हॉल पूर्ण झाला आहे. उत्तरेसही हॉल, नगारखाना म्हणजे उत्तरेकडील पूर्व/पश्चिम बाजूचे बांधकाम झाले आहे. नव्यानेच गैबीच्या पश्चिमेस नवीन मशिदेचे बांधकाम झालेले आहे. 300 वर्षापूर्वीची चिंचेच्या विस्तीर्ण झाडाला धक्का न लावता पूर्ण केले आहे. मंदिरात चिंचेची 5 व लिंबाची पूर्ण वाढ झालेली झाडे आहेत. चिंचेच्या झाडाभोवती पार आहे त्यासही मार्बल फरशा बसवून, विविधता, आकर्षकता, सुंदरता यांचा मिलाफ झाला आहे. एकंदरीत जिर्णोध्दाराचे काम युध्दपातळीवर झाले असून 125 कामगार रात्रदिवस राबले. सदरचे बांधकाम मे. टेक्नॉबिल्ट कंस्ट्रक्शन अ‍ॅण्ड सप्लायर्स – जी. एच. मुल्लाणी (लांजा) यांच्या कुशल देखरेखेखाली झाले. कागल आणि कागल पंचक्रोशीत गहिनीनाथ मंदिराचे बांधकाम म्हणजे प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाते.
विजयादशमी दिवशी गावकामगार पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत निशाण बांधणेत येते. तिसर्‍या गलफेच्या वेळी ज्यु. कागलकर सरकार आणि चौथ्या गलीफाच्यावेळी सिनियर कागलकर यांच्यामार्फत झाडावर निशान बांधतात. पुष्यनक्षत्रापासून काडणी बांधणानंतर उरुसाची प्रक्रिया चालू होते. शाही काळापासून काडणी बांधली जाते. ती तुरबतसमोर पूर्व/पश्चिम अशी बांधली जाते. काडणी बांधल्यानंतर देवाला नारळ फोडला जात नाही. निशाण आणि गलेफ पांढर्‍या शुभ्र कापडांचा असतो. स्वच्छ, प्रामाणिक, शुचिता याचे प्रतिक पांढरे निशाण आहे. पूर्वी नगारखान्यात दररोज पहाटे नगारावादन व्हायचे. त्यासाठी नगारा वाजविणारा कायमस्वरुपी वास्तव्य करुन कागलात राहायचा.

पण हल्ली फक्त मोहरम, उरुस, इतर महत्वाच्या धार्मिक विधीच्याप्रसंगी बावड्याहून नगारा वाजविणार्‍यास बोलावणे पाठवितात. वास्तविक गहिनीनाथ मंदिरातील पारंपारिक नगारा हे वाद्य आहे. त्यामुळे वातावरण मंगलमय आणि स्फुर्तीदायक होते. यासाठी कायमस्वरुपी नगारा वादनाची सोय व्हावी अशी अनेक भाविक नागरिकांची इच्छा आहे. दररोज पहाटे पाचला दर्शनाला नित्यनियमाने येणारे भाविक आहेत. श्री गहिनीनाथ (गैबीस) कागलातील आणि बाहेरील सर्व धार्मिक लोक मोठ्या भक्तीभावाने दर्शनास येतात.

Event information

कागलात नवीन बालक प्रथम गैबीच्या (ओटीत) दर्शनास नेतात. गावात म्हैस व्याली की प्रथम दूध गैबीस अर्पण केले जाते. कागलमधील शेखशिराज देवस्थान शिघ्रकोपी आहे. मात्र मुख्य गहिनीनाथ (गैबी) सर्वाच्या चुका आईच्या हृदयाप्रमाणे पोटात घालून माफ करुन सर्वांवर कृपादृष्टी ठेवते. पहाटे नित्यनियमीत पाच वाचता आणवानी जाऊन दर्शन घेणारे भाविक कागलात आहेत. गहिनीनाथ (गैबी) सर्व भक्तांची आई आहे. गैबीकृपेने सर्वाचे भले होऊ दे. नंतर आपले चांगले होऊ दे असे

कागलचे बुजूर्ग नेहमीच म्हणत असतात. म्हणून गैबीमातेसमोर आम्हा सर्वांचे गार्‍हाणे असे की आई गैबी, येथील प्रत्येकांस तू सुखी ठेव, प्रत्येकांची प्रकृती निरोगी ठेव, शेती उत्तम पिकू दे. शेतीमालास योग्य भाव मिळू दे, व्यापार्‍यांचा व्यापार चांगला होऊ दे, विद्यार्थ्यांना यश मिळू दे, विवाह इच्छुकांना त्यांना मनासारखे स्थळ मिळू दे, जे घरी रुग्ण आहेत त्यांच्या तब्येतीस आराम पडू दे, या नगरीतून नांदण्यास सासरी गेलेल्या प्रत्येक मुलीस सुखी ठेव, त्यांच्या संसार फुलू दे, बाहेरुन येणार्‍या प्रत्येकास तू सुखी ठेव, प्रत्येक नागरिक कर्जमुक्त होऊ दे, सरहद्दीवर संरक्षण करणार्‍या सैनिक बांधवाचे रक्षण कर, मुल नसणार्‍या दाम्पत्यांस पुत्रप्राप्ती होऊ दे, प्रत्येकांस निर्व्यसनी ठेव, सर्वांना सद्बुध्दी, सतसंग दे, गुरुजणांना, जेष्ठ नागरिकांना शतायुषी बनव, प्रत्येकाच्या घरी मंगलमय वातावरणांत सनईवादन होऊ दे, प्रत्येक घरात तुझ्या नावाचा जयजयकार होऊ दे, दिवाळी व तुझा उरुस मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि प्रसन्न मनाने पार पडू दे, कुणाच काय चुकल माकल तर माफ कर. कारण आम्ही तुझीच अजान लेकरे आहोत.

श्री. शामराव भागोजी पाटील (भ्रमणध्वनी – 9921391580)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *