प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर, दि. 29 : राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील खरीप हंगाम 2023 साठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी 31ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडिद, सोयाबीन, भुईमुग, सूर्यफूल या ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पीक स्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी : पीक स्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५० राहिल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
पीक स्पर्धेत सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची यात भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – विहित नमुन्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
स्पर्धा पातळी तसेच सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीक निहाय पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस रुपये पुढील प्रमाणे – तालुका पातळीवर पीकस्पर्धा विजेत्यांसाठी पहिले 5 हजार, दुसरे 3 हजार व तिसरे 2 हजार रूपये. जिल्हा पातळीवरील पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार व तिसरे 5 हजार रूपये इतके व राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार व तिसरे 30 हजार रूपये इतके बक्षीस असेल. पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.