कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) क्रीडा विभागामार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2022-23 वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडूंनी दि. 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या ज्येष्ठ क्रीडा महर्षींकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
अर्ज सादर करणा-या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडुंनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर 22 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहनही जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.