शेती व्यवसाय़ात ट्रॅक्टरचा वापर वाढला; बैलजोड्यांचीही संख्या घटली
साके (सागर लोहार) : राजा सर्जाची घुंगरांचा आवाज करत डौलाने धावणारी जोडी…मामाचा गाव…मातीचा रस्ता…चाकांची खडखड…मुलांचा जल्लौष…त्यावर धावणारी प्रदुषणरहित बैलाची गाडी… ग्रामीण भागात वाहतुकीचे महत्त्वाचे साधन व पर्यायाने तेथील अर्थव्यवस्थेचा एक भाग असलेली ही बैलगाडी आता काळाच्या ओघात इतिहासजमा होण्याच्या मार्गावर धावत आहे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
शेता शिवारासह नागमोडी वाट असो किंवा सपाट-सखल मातीच्या कच्या रस्तावरुन सुसाट वेगाने धावणारी ग्रामीण भागातील शेतकर्याची ‘सुपरफास्ट एक्स्प्रेस’ म्हणजे बैलगाडी, तिचे दर्शन होणे आता अगदी दुर्मीळ होत चालले आहे. तालुक्यात बैलगाडीचा वापर खूपच कमी झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतीशी निगडित वाहतुकीसाठी बैलगाडीला महत्त्वाचे स्थान होते. घरापुढे बैलगाडी असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. रस्त्यांचा विकास झालेला नव्हता तेव्हा बैलगाडी हेच दळणवळणाचे प्रमुख साधन होते. देवदेवतांची मिरवणूक असो किंवा नवरदेवाची वरात असो, बैलगाडीलाच अनन्यसाधारण महत्त्व होते. अगदी अलिकडच्या काळात विजयी उमेदवारांची जल्लोषी मिरवणूकही सजविलेल्या बैलगाडीतूनच काढण्याची परंपरा आजही कायम आहे. पुर्वी घरोघरी असणारी बैलजोडी आणि शेतीकामात उपयुक्त असणारी लाकडी बैलगाडी फक्त कांही मोजक्याच शेतक-यांच्याकडे पहायला मिळत आहे. किंवा चित्रातच पाहण्यापुर्ते बैलगाडीचे महत्व शिल्लक राहिले आहे.
शेणाने सारवलेले अंगण,अंगणात रिकामी सोडलेली लाकडी बैलगाडी अंगणाची पर्यायाने त्या घराण्याची शोभा वाढवत होती. सध्या शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वाढलेला वापर कमी कष्टात जास्त उत्पादन घेण्याचा मानस तसेच तरुण वर्गांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टर व पाॅवर ट्रेलर सारख्या यंत्रांनी घेतलेली आहे शेती कसण्यासाठी शेतकरी सुरुवातीपासूनच बैलांचा वापर करत आला आहे. एका गल्लीतील चार-पाच बैलगाड्या पहायला मिळत होत्या त्या बैलगाडी च्या जागी आता ट्रॅक्टर व पावर ट्रेलर च पहायला मिळत आहेत. शेतीमशागतीची सर्वच कामे आता आधुनिक यंत्राद्वारे होत असल्याने शेतीमध्ये बैलगाडीचे महत्व कमी झाले आहे.
यंत्राद्वारे केला जाणाऱ्या शेतीसाठी कमी मनुष्यबळ जास्त दाम मिळवताना दिसून येत आहे एकीकडे यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात तर दुसरीकडे शेत जमीन करण्यासाठी लागणाऱ्या बैलजोडीच्या व गाडीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे एके काळी यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर सांगणारी बैलगाडी आजच्या काळाच्या पडद्याआड जात आहे तिचे असणारे अस्तित्व आज आधुनिकीकरणामुळे पुसले गेले आहे परिणामी घरातील अंगणाची वाढवणारी शोभा बैलगाडी मुळे कमी झाली आहे. पुर्वी परिस्थिती बेताची त्यात शिक्षण घेण्याची आर्थिक कुवत नसल्याने अनेक शेतक-यांनी मुलांना बैलजोड्या घेवून देवून शेती मशागतीची कामे करण्यातच धन्यता मानली त्यामुळे खेडेगावातील तरूण अशिक्षित राहिला व वडिलार्जीत शेतीव्यवसायावरच आपला उदरनिर्वाह करून उपजिविका जगू लागला. लोखंडी गाड्या वापरात येवू लागल्या त्यातही पुन्हा बदल झाला अनं ट्रॅक्टर च शेतीसाठी घरोघरी वापर वाढला. परंतू दुस-या बाजूला नक्षिदार कलाकुसर करून लाकडी गाडी बनविणारा सुतारकाम व्यवसायावर गदा आली त्यामुळे बैलगाडीचे असणारे अस्तित्वच आता संपुष्ठात आले असल्याचे चित्र सद्या पहायला मिळत आहे.
बैलगाडीचा इतिहास…..
लाकडाची सुबक, दणकट आणि कलाकुसर करून बैलगाडी बनविण्याचे काम सुतार करीत असत. यासाठी लागणारी चाके व तुब सागाच्या लाकडापासून बनविले जात. ही तुब काढण्यासाठी आतासारखे यंत्र नव्हते, तर ती हाताच्या कलाकुसरीने तयार केली जात असे. बैलगाडी तयार करण्यासाठी होणारा खर्च काळानुरूप वाढत गेला. अलिकडे 12 ते 14 हजार यासाठी खर्च येतो. यामधून कारागिरास मजुरी मिळायची, मात्र पुढे यांत्रिकीकरणामुळे सुटे भाग सहजपणे यंत्रावर तयार होऊ लागल्याने मजुरांच्या पोटावर पाय आला.
बैलगाडी आठवणीतचं….
शेतकऱ्यांच्या जगण्याचा कधीकाळी बैल हा एकमेव आधार होता आणि बैलगाडी हेच साधन प्रत्येक कामासाठी वापरले जात असे. परंतु कालानुरूप बैल व गाडी मागे पडत गेले असले, तरी त्यांच्या सोबतच्या आठवणी मात्र प्रत्येक शेतक-यांच्या मनात आजही कायम राहिल्या आहेत.