वृक्षारोपण करण्यापूर्वी रोपे लावताना ही काळजी घ्या
आपल्याकडे यंदाचा पावसाळा सुरू झाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात आपण सर्वजण वृक्षारोपण करून निसर्गसेवा करत असतो. आपण रोपे लावतो व पावसाळ्यात त्यांची काळजी घेतो, संगोपन करतो जेणेकरून त्यांची नीट वाढ होईल. पण वृक्षारोपण करण्यापूर्वी आपण खालील मुद्द्यांचा विचार करा जेणेकरून आपण केलेल्या वृक्षारोपणाचे व घेतलेल्या परिश्रमाचे भविष्यात चांगले भरीव परिणाम दिसतील.
१) वीजवाहिन्या व टेलिफोनवाहिन्या यांच्या खाली मोठी वाढणारी रोपे लावू नका. कारण तीच झाडे मोठी झाल्यावर वीजवाहिन्यांना स्पर्श करून earth fault मुळे मोठा वीज अपघात करू शकतात. लावायचीच असतील तर कमी उंचीची मध्यम आकाराची रोपे लावा.
२) ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाईपलाईन व गटारीजवळ कोणतीही रोपे लावू नका. कारण रोपे मोठी झाल्यावर त्यांची मुळे पाण्याच्या पाईपलाईन व ड्रेनेज पाईपलाईन मध्ये घुसू शकतात.
३) जमिनीखालून गेलेल्या वीजवाहिन्यांच्या आसपास खड्डे खणू नका व तिथे रोपेही लावू नका. भूमिगत वीजवाहिन्यांच्या इन्सुलेशनला धक्का पोहचून शॉक लागून मोठा अपघात होऊ शकतो. (भूमिगत वीजवाहिन्यांच्या क्षेत्रात खड्डे काढायला परवानगी नसते)
४) शाळेच्या, कार्यालयाच्या, इमारतींच्या आवारात रोपे लावताना ती काटोकाट भिंतीला, कंपौंडला लागून लावू नका, लावली तरीही मध्यम वाढणारी झाडे लावा आणि भिंत, कंपौंडपासून थोडे अंतर ठेवून लावा. भविष्यात त्या रोपांच्या मुळांचा शाळेच्या भिंतींना, कंपौंडच्या भिंतीला धोका पोहचू नये.
५) माळरानावर, पठारावर, सड्यावर वृक्षारोपण करू नका. कारण माळरान, पठार व सडे हे स्वतःच एक वेगळी परिसंस्था असते, वृक्षारोपण केल्यामुळे त्याठिकाणी असलेली existing जैवविविधता धोक्यात येऊ शकते.
६) पावसाळ्यात आपण उत्साहाच्या भरात जागा दिसेल तिथे वृक्षारोपण करतो पण ज्या ठिकाणी नियमित पाणी देणे व देखरेख करणे शक्य आहे अशाच ठिकाणी वृक्षारोपण करा. कारण पावसाळा संपल्यानंतर रोपांची पाण्याअभावी वाढ खुंटू शकते व रोपे मरू शकतात.
७) शक्यतो लहान रोपे (१ ते २ फुटांची) लावण्यापेक्षा मोठी रोपे लावा. साधारण ४ फुटाच्या पुढची रोपे लावण्याचा प्रयत्न करा कारण भविष्यात ती जमिनीत सहजपणे रुजतात व जमिनीत खोलवर मुळे गेल्यामुळे पाण्याचीही कमी गरज भासते. रोपे मोठी लावल्यामुळे ट्रीगार्ड लागण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.
८) वृक्षारोपण केल्यावर शक्यतो रोपांच्या संरक्षणासाठी काही दिवसांसाठी ट्रीगार्ड व काटेरी कुंपणाची व्यवस्था करा जेणेकरून जनावरांच्याकडून रोपे खाल्ली जाणार नाहीत. वादळ, वारा, रोपांची चोरी, रोपे तोडणे यामुळे होणारे रोपांचे नुकसान टाळता येते.
९) वड, पिंपळ,नांद्रुक,उंबर ही मोठी डेरेदार वाढणारी झाडे एकमेकांना लागून (अगदी जवळ जवळ) लावू नका. भविष्यात होणारी वाढ लक्षात घेऊन त्यांच्या कॅनॉपीचा विस्तार लक्षात घेऊन त्यांच्यात योग्य अंतर ठेवा. ही रोपे लावताना त्यांचा सभोवताली असणार परिघ पूर्ण मोकळा असला पाहिजे.
१०) सर्वात महत्वाचे म्हणजे रोपे तेवढीच लावा जेवढी आपण जगवू शकतो. आजकाल पावसाळा सुरू झाला की आपण खूप भरमसाठ रोपे लावतो पण नंतर त्याची दुरावस्था झाल्यावर त्या रोपांच्याकडे पहायला देखील कोणी नसते.
मग चला तर आजपासूनच या चांगल्या कामाची सुरुवात करूया. एकजुटीने निसर्गाची सेवा करू या