कागलमध्ये भीमा – कोरेगाव शौर्यस्तंभाला अभिवादन
कागल, दि. १: भीमा -कोरेगाव येथे दोनशे पाच वर्षांपूर्वी बटालियनने अद्भुत आणि अतुलनीय शौर्य गाजवले. त्या शौर्याला आम्ही सर्वजण नतमस्तक आहोत, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल शहरातील निपाणी वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये भीमा- कोरेगावच्या २०५ व्या शौर्य दिनानिमित्त उभारलेल्या शौर्यस्तंभास आमदार श्री. मुश्रीफ यांच्यासह प्रमुखांनी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक महादेव ईराप्पा कांबळे होते. तुषार भास्कर, दीपक कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, चार वर्षांपूर्वी भीमा – कोरेगावला दुर्दैवी घटना घडली आणि हा शौर्यस्तंभ चर्चेत आला. एक जानेवारी रोजी बटालियनच्या अवघ्या ५०० बहाद्दर सैनिकांनी अतुल्य व ऐतिहासिक शौर्य गाजवले होते. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.
शौर्य स्तंभाची हुबेहू प्रतिकृती उभारणाऱ्या सुरेश घस्ते यांचा श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला. श्री. मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.
यावेळी आजी-माजी सैनिकांचा सन्मानही करण्यात आला. ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, मेजर सुभेदार लगमाना कांबळे, तुषार भास्कर, विवेक लोटे, दिपक वादळ, बच्चन कांबळे व मान्यवर उपस्थित होते.