कोल्हापूर : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, देशातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र युवकांना ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप देण्यात येणार असून, दरमहा ९,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर प्रोफाइल तयार करून विविध क्षेत्रांतील इंटर्नशिपसाठी अर्ज करावेत.
सध्या उपलब्ध असलेल्या संधींमध्ये एचडीएफसी बँक लिमिटेड येथे विक्री व विपणन (Sales & Marketing) क्षेत्रात पदवीधरांसाठी १८ जागा असून अर्जाची अंतिम मुदत ३० जुलै आहे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड येथे बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विक्री व विपणन क्षेत्रात ४ जागा असून अंतिम मुदत २७ जुलै आहे. रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड येथे पदवीधरांसाठी विक्री व विपणन क्षेत्रात अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जुलै आहे.

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवीधरांसाठी विक्री व विपणन क्षेत्रात १३ संधी उपलब्ध असून अर्जाची अंतिम मुदत १८ जुलै आहे. तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ग्राहक सेवा (Customer Care/Service) क्षेत्रात बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २ जागा उपलब्ध असून अर्जाची अंतिम तारीख १४ जुलै आहे.
उमेदवारांना अर्जाच्या अंतिम मुदतीपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला भारत सरकारमार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण दिले जाणार आहे. याशिवाय संबंधित कंपनीकडून अतिरिक्त अपघात विमा संरक्षणही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.