सांगली : बळीप्रतिपदेच्या आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गृहोपयोगी उपकरणांच्या क्षेत्रात एक मोठी तांत्रिक क्रांती घडली आहे. सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे युवा संशोधक व इनोव्हेटर प्रसाद सदिगले यांनी आपल्या प्रगत आणि पेटंटेड तंत्रज्ञानाच्या जोरावर जगातील पहिले ’२ इन १ आईस्क्रीम मेकर अन् मिक्सर बाजारात लाँच केले आहे.
स्वयंपाकघरातील नियमित मिक्सरपेक्षाही अधिक प्रगत तंत्रज्ञान वापरून या उपकरणाद्वारे अवघ्या १५ मिनिटांत ताजे, मऊ आणि चविष्ट ’स्कूपेबल’ आईस्क्रीम घरच्या घरी तयार करता येणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेले पारंपरिक आईस्क्रीम मेकर्स अत्यंत महागडे असतात. शिवाय, ते वापरण्यापूर्वी त्यांचा बाऊल रात्रभर किंवा अनेक तास फ्रीजमध्ये थंड ठेवावा लागतो. केवळ आईस्क्रीम बनवण्यासाठी एवढा मोठा खर्च करणे आणि तासन्तास वाट पाहणे सामान्य ग्राहकांना परवडणारे नसते. याच समस्येवर मात करत, युवा संशोधक प्रसाद सदिगले यांनी ’आईस्क्रीम मेकर अँड मिक्सर’ या आपल्या स्टार्टअप अंतर्गत हे अनोखे उपकरण विकसित केले आहे.

मिक्सरच्या फिरण्याच्या गतीचा आणि प्रगत थर्मल तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून अवघ्या १५ मिनिटांत फ्रेश आईस्क्रीम तयार होते. नियमित मिक्सर आणि आईस्क्रीम मेकरचे ’२ इन १’ वैशिष्ट्य असल्यामुळे ग्राहकांना एकाच किमतीत आणि एकाच उपकरणात दुप्पट फायदा मिळतो.
या लाँचिंग प्रसंगी बोलताना प्रसाद सदिगले यांनी सांगितले की, या नाविन्यपूर्ण आईस्क्रीम मेकरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि व्यावसायिक संधी याबद्दल लवकरच सविस्तर घोषणा केली जाईल. याशिवाय, ऊर्जा बचत आणि हरित तंत्रज्ञानावर आधारित २९ पेक्षा जास्त नवनवीन उत्पादने लवकरच बाजारात आणण्याचा त्यांचा मानस आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीच्या युवा संशोधकाने विकसित केलेल्या या भारतीय तंत्रज्ञानाने गृहिणींसाठी आणि व्यावसायिकांसाठी हे अनोखे सरप्राईज दिले आहे. कमी खर्चात आणि झटपट घरगुती आईस्क्रीम बनवणार्या या ’२ इन १ आईस्क्रीम मेकर अन् मिक्सर’ला बाजारात मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.