पतीच्या क्रमांकासाठी चारचाकी वाहनांचे अर्ज 18, तर दुचाकीचे अर्ज 19 नोव्हेंबर रोजी स्वीकारणार
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथील दुचाकी वाहनांची सध्या सुरू असलेली नोंदणी मालिका ‘MH-09-HL’ लवकरच संपणार आहे. त्यानंतर दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका ‘MH-09-HN’ दिनांक 18 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. या नवीन मालिकेतील पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी चारचाकी वाहनांचे अर्ज 18 नोव्हेंबर रोजी, तर दुचाकी वाहनांचे अर्ज 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत खिडकी क्रमांक 9 येथे स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी अर्जासोबत गृह विभाग, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार विहित केलेल्या शुल्काची मूळ रक्कम दर्शविणारा धनाकर्ष (Demand Draft) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पेऑर्डर स्वीकारण्यात येणार नाही. धनाकर्ष ‘REGIONAL TRANSPORT OFFICE KOLHAPUR’ या नावानेच काढलेला असावा. अन्य नावाने काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ शुल्काचा एकच धनाकर्ष अर्जासोबत सादर करावा. धनाकर्षाच्या मागील बाजूस अर्जदाराचे नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक आणि आधार संलग्न मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

चारचाकी वाहनांच्या पसंतीच्या क्रमांकासाठीचे सिंगल डी.डी. व लिलावात गेलेल्या क्रमांकांच्या याद्या 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 नंतर प्रसिद्ध करण्यात येतील. दुचाकी वाहनांच्या पसंतीच्या क्रमांकासाठीचे सिंगल डी.डी. व लिलावात गेलेल्या क्रमांकांच्या याद्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 नंतर प्रसिद्ध करण्यात येतील.
एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. चारचाकी वाहनांसाठी 19 नोव्हेंबर रोजी, तर दुचाकी वाहनांसाठी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3.30 या वेळेत जादा रकमेचा एकच स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करणे बंधनकारक आहे. लिलाव प्रक्रिया चारचाकी वाहनांसाठी 19 नोव्हेंबर रोजी, तर दुचाकी वाहनांसाठी 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.
लिलावास केवळ अर्जदार किंवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. अर्जदाराने उपस्थित राहताना ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित असल्यास त्यांच्याकडे प्राधिकारपत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. लिलावातील वाढीव रकमेचा धनाकर्ष जाड, अपारदर्शक लखोट्यात घडी करून सीलबंद स्वरूपात सादर करावा, जेणेकरून आतील रक्कम बाहेरून दिसणार नाही. लिलावासाठी दुसऱ्यांदा सादर केलेल्या धनाकर्षाची रक्कम आणि मूळ रकमेचा धनाकर्ष यांची एकत्रित रक्कम विचारात घेऊन सर्वाधिक जादा रक्कम देणाऱ्या अर्जदारास क्रमांक देण्यात येईल. समान वाढीव रक्कम प्राप्त झाल्यास किंवा दुसऱ्यांदा धनाकर्ष सादर न झाल्यास प्रथम धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास क्रमांक देण्यात येईल.
आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक व पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. अर्जावर मोबाईल क्रमांक नमूद नसल्यास आकर्षक क्रमांकावर अर्जदाराचा कोणताही हक्क राहणार नाही. यादीमध्ये नाव आले तरी संबंधित आकर्षक क्रमांक मिळणार नाही. एकदा राखीव ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. क्रमांक राखीव ठेवल्याच्या दिनांकापासून 180 दिवसांच्या आत वाहनाची नोंदणी न केल्यास किंवा संबंधित मालिका संपल्यानंतर राखीव क्रमांक आपोआप रद्द होईल व त्यासाठी भरलेले शुल्क शासनजमा होईल. विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी भरलेले शुल्क परत करण्यात येणार नाही.
अर्जदारांनी पसंतीच्या क्रमांकाच्या शुल्काची खात्री करूनच धनाकर्ष सादर करावा. नजरचुकीने चुकीच्या रकमेचा धनाकर्ष स्वीकारला गेला आणि पडताळणीदरम्यान कार्यालयाच्या निदर्शनास आल्यास लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल. लिलावातील वाढीव रकमेचा एकच धनाकर्ष स्वीकारण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या दुचाकी वाहनांच्या ‘MH-09-HL’ मालिकेतील उर्वरित क्रमांक संपल्यानंतर नवीन ‘MH-09-HN’ मालिका फॅन्सी नंबर पोर्टलवर प्रदर्शित करण्यात येणार आहे,
पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करणाऱ्या वाहनधारकांनी वरील सर्व सूचनांचे पालन करून विहित वेळेत अर्ज व आवश्यक धनाकर्ष सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.