पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयास बी.एच.एम.एस. पदवी अभ्यासक्रमाची मान्यता

नवी दिल्लीच्या राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाची मोहोर; आधुनिक व प्रशस्त पायाभूत सुविधा सज्ज

कागल (प्रतिनिधी): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अथक प्रयत्नांमुळे कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयास ‘बी.एच.एम.एस.’ (B.H.M.S.) पदवी अभ्यासक्रमाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने नुकतीच या अभ्यासक्रमाला ‘लेटर ऑफ परमिशन’ देऊन १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेसह मान्यता दिली आहे. या महत्त्वपूर्ण मान्यतेमुळे महाराष्ट्रातील होमिओपॅथी शिक्षणाला एक नवी दिशा मिळणार आहे.

अत्याधुनिक सुविधांची उपलब्धता:

Advertisements

या महाविद्यालयात राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाच्या सर्व निकषांचे पालन करून आधुनिक व प्रशस्त पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने:

Advertisements
  • अत्याधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा आणि डिजिटल एक्स-रे युनिटची उपलब्धता.
  • मेडिसीन, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र, तसेच बालरोग विभागाच्या स्वतंत्र बाह्यरुग्ण सेवा.
  • ५० खाटांचा सुसज्ज आंतररुग्ण विभाग, ज्याचा आतापर्यंत १०,००० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी येथे अत्याधुनिक ‘स्किल लॅब’, ‘मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी युनिट’ आणि ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार अद्ययावत पुस्तके, जर्नल्स व ई-रिसोर्सेसनी समृद्ध ग्रंथालय देखील विद्यार्थ्यांसाठी सज्ज आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अनुभवी प्राध्यापक, प्रशिक्षित कर्मचारी आणि आधुनिक अध्यापन साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कागल येथील हे महाविद्यालय पश्चिम महाराष्ट्रातील पहिले, तर संपूर्ण महाराष्ट्रातील दुसरे शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय ठरले आहे. उच्च दर्जाचे शिक्षण, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि कौशल्यआधारित वैद्यकीय प्रशिक्षणाचा संगम साधत हे महाविद्यालय १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पूर्णतः सज्ज झाले असून, राज्यातील होमिओपॅथी शिक्षण व आरोग्यसेवेत भरीव योगदान देण्यासाठी सज्ज झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!