पेठवडगाव बस स्थानकाला आले तळ्याचे स्वरूप : घाईघाईत केलेल्या उद्घाटनाचा फटका

पेठवडगाव: २२ गावांची प्रमुख बाजारपेठ आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पेठवडगाव येथील मुख्य बस स्थानकाची पहिल्याच मोठ्या पावसात दुरवस्था झाली आहे. बस स्थानक परिसरात पाणी साचल्यामुळे हे स्थानक एखाद्या तळ्यासारखे दिसत आहे.

Advertisements

बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे चालक आणि वाहकांना बसेस प्लॅटफॉर्मला लावणे अशक्य झाले आहे. चिखल आणि साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे बसेस प्लॅटफॉर्म सोडून इतरत्र उभ्या कराव्या लागत आहेत. यामुळे प्रवाशांना धावपळ करत आणि पाण्यातून वाट काढत बस पकडावी लागत आहे. शाळकरी मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांचे कपडे आणि दप्तर भिजत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Advertisements

या पाण्याचा फटका केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर बस स्थानक परिसरातील दुकानदारांनाही बसत आहे. दुकानांसमोर पाणी साचल्यामुळे ग्राहकांना पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पाणी दुकानात शिरून मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनावर सवाल

काम पूर्ण होण्यापूर्वी केवळ श्रेयवादासाठी किंवा घाईघाईत या बस स्थानकाचे उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. ऐन पावसाळ्यात प्रवाशांना होत असलेल्या त्रासामुळे प्रशासनाने त्वरित पाण्याचा निचरा करावा आणि बस स्थानकाची दुरवस्था सुधारावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!